महामंडळांवरील नियुक्त्यांना अखेर मुहूर्त; काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेतील कुणाची लागणार वर्णी? - maharashtra state corporations appointments will be done shortly | Politics Marathi News - Sarkarnama

महामंडळांवरील नियुक्त्यांना अखेर मुहूर्त; काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेतील कुणाची लागणार वर्णी?

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021

राज्यातील महामंडळांवरील नियुक्त्या रखडल्या होत्या. या नियुक्त्यांना अखेर मुहूर्त लागला आहे. 

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन वर्ष उलटून गेले असून, आता राज्यातील विविध महत्वाच्या महामंडळांवरील नियुक्त्यांना मूहूर्त लागला आहे. विविध महामंडळांसह इतर समित्यांवर कोणत्या पक्षाला किती प्रतिनिधित्व द्यायचे याची चर्चा सुरू आहे. सरकारमधील शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या नावांच्या याद्याही तयार असल्याचे समजते. यात कोणत्या पक्षाला किती प्रतिनिधित्व मिळणार याची आता उत्सुकता आहे.  

राज्यातील महामंडळांची संख्या मोठी आहे. काही महामंडळांच्या अध्यक्षांना कॅबिनेट मंत्रिपदाचा तर काही महामंडळांच्या अध्यक्षांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा आहे. मंत्रिपद मिळाले नाही अशा नेत्यांचा या महामंडळांवर डोळा असतो. तसेच, प्रमुख कार्यकर्ते यासाठी फिल्डींग लावून असतात. उद्धव ठाकरे यांचे सरकार तीन पक्षांचे असल्याने सहमती व्हायला वेळ लागतोय, याचा अनुभव महामंडळांचे इच्छुक सुरवातीपासून घेत आहेत. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर लगेचच महामंडळांचा निर्णय होऊ शकला नाही. सरकार स्थिरस्थावर होतेय असे वाटत असताना कोरोनाचे संकट आल्याने महामंडळांचा विषय मागे पडला होता. आता पुन्हा याला वेग आला आहे. 

फौजिया खान, इम्तियाज जलील यांच्यावर नवीन जबाबदारी 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार डॉ. फौजिया खान आणि एआयएमआयएमचे खासदार सय्यद इम्तियाज जलील या मराठवाड्यातील दोन नेत्यांवर राज्य सरकारने नवीन जबाबदारी टाकली आहे. त्यांची महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळावर सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. फौजिया खान आणि इम्तियाज जलील यांच्या नियुक्तीनंतर आता राज्यातील महामंडळांसह इतर समित्यांवरील नियुक्त्यांना अखेर मुहूर्त लागला आहे. महामंडळावरील नियुक्तांना वेग आला असून, सरकारी पातळीवर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. महामंडळांवर कोणत्या पक्षाला किती प्रतिनिधित्व द्यायचे याची चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

शिवसेनेने काही दिवसांपूर्वी महामंडळावरील नियुक्त्यांसाठी आमदार, जिल्हाप्रमुख व पालकमंत्र्यांकडून याद्या मागवण्यास सुरूवात केली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर सत्तेत सहभागी असलेल्या तिन्ही पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. राज्यातील सिंचन महामंडळे विदर्भ, कृष्णा खोरे, म्हाडा, सिडको तसेच विविध देस्थान मंडळांवरील नियुक्त्या महत्वाच्या मानल्या जातात. पक्षाला सत्तेवर आणण्यासाठी मेहनत घेतलेल्या कार्यकर्त्यांची अशा महामंडळ, समित्यांवर नियुक्ती करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो.

कोरोनाचा परिस्थिती आता काहीशी आटोक्यात आली आहे, राज्यातील बहुतांश व्यवहार सुरळीत होऊन अर्थव्यवस्था पुर्वपदावर आणण्याच्या दिशेने सरकारची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे महामंडळांवरील नियुक्त्यांच्या कामालाही सुरूवात झाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या याद्या तयार असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शिवसेनेच्या संपर्कप्रमुखांमार्फत तातडीने याद्या तयार करण्याचे आदेश नुकतेच दिले आहेत. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख