मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात रेणू शर्मा नावाच्या तरूणीने बलात्काराची तक्रार पोलिसांकडे केली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी झाल्याचे चित्र आहे. कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही, अशी भूमिका आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली आहे. यामुळे मुंडेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
बलात्काराच्या आरोपावर धनंजय मुंडे यांनी खुलासा केला होता. तक्रारदार तरुणी रेणू शर्माची बहीण करुणा शर्मा हिच्याशी माझे संबंध होते आणि मला तिच्यापासून दोन मुले आहे, असे मुंडेंनी स्पष्ट केले होते. मुंडे यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकरणी कारवाई करण्याचे टाळले असून, हा ब्लॅकमेलचा प्रयत्न असल्याचे पक्षाच्या काही नेत्यांचे म्हणणे आहे.
रेणू शर्मा यांच्या तक्रारीवर पोलिसांकडून कारवाई केली जात नसल्याचा आरोप होत आहे. याबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख यांना विचारणा करण्यात आली होती. या प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आता भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही मग तो मंत्रीही असो. महाराष्ट्रात कायदा कोणासाठीही भेदभाव करणार नाही. आमचे पोलीस या प्रकरणाचा योग्य तपास करतील आणि जो दोषी आढळेल त्यावर कारवाई करतील. या प्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू आहे.
रेणू शर्मा यांनी डी.एन. नगर पोलीस ठाण्याला काल (ता.14) भेट दिली होती. या वेळी त्यांनी सहायक पोलिस आयुक्तांसमोर जबाब नोंदविला होता. त्यावेळी रेणू शर्मा यांच्या वकील रमेश त्रिपाठी उपस्थित होते. आता रमेश त्रिपाठी यांनाच धमक्या येत असल्याने खळबळ उडाली आहे.
रेणू शर्मा यांनी आधी ओशिवरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले होते की, बहिणीच्या लग्नात 1997 मध्ये तिचा मुंडेंशी परिचय झाला होता. बहीण गर्भवती असताना 2006 मध्ये मी एकटीच घरी असताना मुंडे आले होता. ते रात्री घरी आले आणि त्यांनी माझ्यावर बलात्कार केला. अशा प्रकार दर दोन-तीन दिवसांची येऊन ते लैंगिक शोषण करीत होता. याचबरोबर त्यांनी याचा व्हिडीओही तयार केला होता.
मुंडे नंतर वारंवार मला फोन करुन माझ्यावर प्रेम असल्याचे सांगत होते. मला गायिका बनायचे असेल तर चित्रपट क्षेत्रात त्याच्या खूप ओळखी असल्याचे त्यांनी सांगितले होते. बडे चित्रपट दिग्दर्शक आणि निर्मात्यांना भेटून तुला लाँच करतो, असेही आश्वासन त्यांनी दिले होते. अशा प्रकारे ते माझ्याशी शारीरिक संबध ठेवत होता, असे रेणू शर्मा यांनी तक्रारीत म्हटले होते.
Edited by Sanjay Jadhav

