दुसऱ्यापेक्षा तिसरी लाट भीषण अन् 60 लाखांहून अधिक जणांना संसर्ग होईल; आरोग्यमंत्र्यांचा अंदाज - maharashtra heath minister rajesh tope predicts about covid third wave | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

दुसऱ्यापेक्षा तिसरी लाट भीषण अन् 60 लाखांहून अधिक जणांना संसर्ग होईल; आरोग्यमंत्र्यांचा अंदाज

वृत्तसंस्था
सोमवार, 19 जुलै 2021

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली होती. आता तिसरी लाट  येण्याचा अंदाज तज्ञ व्यक्त करु लागले आहेत. 

मुंबई : कोरोनाच्या (Covid-19) दुसऱ्या लाटेत (Second Wave) आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली होती. आता तिसरी लाट (Third Wave) येण्याचा अंदाज तज्ञ व्यक्त करु लागले आहेत. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही तिसरी लाट ही दुसऱ्या लाटेपेक्षा मोठी असेल, असा इशारा दिला आहे. या लाटेत रुग्णसंख्या 60 लाखांवर जाईल, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.  

टोपे म्हणाले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सुमारे 40 लाख जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. दुसऱ्यापेक्षा तिसरी लाट मोठी असेल. दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या जास्त असेल ती 60 लाखांच्या आसपास असेल, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. रुग्णसंख्या वाढल्यानंतर वैद्यकीय ऑक्सिजनची मागणीही वाढणार आहे. ही मागणी 2 ते 4 हजार टनांपर्यंत जाऊ शकते. कोरोनाचा संसर्गाचा वेग कमी करण्यासाठी गर्दी टाळायला हवी. याचबरोबर सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम रद्द करावेत. 

मागील 10 दिवसांत कोरोनाचे दररोज सरासरी 7 ते 8 हजार रुग्ण सापडत आहेत. काल (18 जुलै) राज्यात कोरोनाचे 9 हजार नवीन रुग्ण सापडले असून, 180 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात 62.14 लाख रुग्ण नोंदवण्यात आले असून, 1.27 लाख जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

महाराष्ट्राच्या टास्क फोर्सचाही अंदाज 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली टास्क फोर्सची बैठक 16 जूनला झाली होती. या बैठकीत तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला होता. या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत तिसऱ्या लाटेचा अंदाज मांडण्यात आला होता. तिसरी लाट पुढील दोन ते चार आठवड्यांत येणार असल्याचा अंदाज महाराष्ट्राच्या टास्क फोर्सने व्यक्त केल्याचे वृत्त होते आहे. मागील काही दिवसांतील राज्यातील अनेक शहरांतील गर्दीचा अभ्यास करुन हा अंदाज वर्तवण्यात आल्याचेही सांगण्यात आले होते. नंतर टास्क फोर्सने असा अंदाज वर्तवल्याचा इन्कार केला होता. 

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या प्रस्तावांना काँग्रेस नेतृत्वाने दाखवली केराची टोपली 

देशातील अनेक राज्यांत आता कोरोनाचे निर्बंध शिथिल होऊ लागले आहेत. यामुळे गर्दी मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी बोलताना 'एम्स'चे प्रमुख डॉ.रणदीप गुलेरिया म्हणाले होते की, देशात कोरोना संसर्गाची तिसरी लाट येणे अपरिहार्य आहे. ही लाट पुढील 6 ते 8 आठवड्यांत येण्याची शक्यता आहे. या लाटेचा सामना करण्यासाठी जास्तीत जास्त लोकंसख्येचे कोरोना लसीकरण करणे अतिशय गरजेचे आहे. लोक कोरोनाविषयक उपाययोजनांकडे दुर्लक्ष करु लागले आहेत. मागील दोन लाटांकडे बघून आपण शिकलो नाही असेच आता म्हणावे लागत आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख