महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणतात, सुशांतच्या मृत्यूप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच तपास होईल - maharashtra government will abide by supreme court order says anil deshmukh | Politics Marathi News - Sarkarnama

महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणतात, सुशांतच्या मृत्यूप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच तपास होईल

वृत्तसंस्था
रविवार, 16 ऑगस्ट 2020

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूला दोन महिने उलटूनही त्यावरुन उठलेला गदारोळ सुरूच आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या विविध याचिकांवर पुढील आठवड्यात निकाल अपेक्षित आहे. 

दिल्ली : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी सक्त वसुली संचालनालयाने चौकशी सुरू केली असून, केंद्रीय अन्वेषण विभागानेही (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी केलेल्या तपासाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबाबत बोलताना महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच तपास होईल, असे स्पष्ट केले आहे. 

सुशांतच्या मृत्यूप्रकरणी त्याचे पिता के.के.सिंह पाटण्यातील राजीवनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. यानंतर तपासावरून महाराष्ट्र आणि बिहार सरकार एकमेकांविरोधात उभे राहिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दोन राज्यांचे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असताना यात ईडीनेही उडी घेतली. सुशांतचा मृत्यू आणि आर्थिक अनियमतितेप्रकरणी ईडीने रिया हिच्यासह सहा जणांवर करचुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने या प्रकरणी रिया चक्रवर्ती, तिचे पिता इंद्रजित, आई संध्या, भाऊ शोविक, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युएल मिरांडा आणि बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, सुशांतच्या मृत्यूप्रकरणी दाखल याचिकेवर महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. पुढील आठवड्यात सर्वोच्च न्यायालय यावर निर्णय देणार आहे. या निर्णयानुसार राज्य सरकार कार्यवाही करेल. 

या प्रकरणात आता श्री राजपूत राष्ट्रीय करनी सेनेने उडी घेतली आहे. करनी सेनेने आज इंडिया गेटवर आंदोलन केले. तसेच, सुशांतने आत्महत्या केली नसल्याचा दावा करनी सेनेने केला आहे.  करनी सेनेचे प्रमुख सुखदेवसिंह गोगोमेदी म्हणाले की, सुशांतच्या मृत्यूप्रकरणी सरकारने सीबीआय चौकशी सुरू करावी. सरकारने सीबीआय चौकशी न सुरू केल्यास करनी सेना आंदोलन करेल. करनी सेना रस्त्यावर उतरुन देशातील राष्ट्रीय महामार्ग रोखून धरेल. सुशांतचा मृत्यू आत्महत्येने झालेला नाही. बॉलीवूडमधील गँगनी सुशांतची हत्या केली आहे. अंडरवर्ल्डच्या म्हणण्यानुसार या गँग काम करीत आहेत. 

गोगामेदी यांनी या प्रकरणी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचीही भेट घेतल्याचा दावा केला. याचबरोबर करनी सेनेने बिहारमध्ये जाऊन सुशांतच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली आहे. याआयदी करनी सेनेने शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांविरोधात तक्रार दाखल केली होती.   

सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 56 जणांचे जबाब नोंदविले आहेत. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा समावेश आहे. 

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख