अर्णब गोस्वामींना अटक पण नाही अन् त्यांच्यावर कोणती कारवाईही नाही! - maharashtra government gave relief to arnab goswami in trp scam | Politics Marathi News - Sarkarnama

अर्णब गोस्वामींना अटक पण नाही अन् त्यांच्यावर कोणती कारवाईही नाही!

वृत्तसंस्था
शनिवार, 13 फेब्रुवारी 2021

बनावट टीआरपी प्रकरणात रिपब्लिक टीव्हीसह अर्णब गोस्वामींच्या अडचणीत वाढ होत असताना त्यांना आता दिलासा  मिळाला आहे.  

मुंबई : बनावट टीआरपी प्रकरणात रिपब्लिक टीव्हीसह तिचे संपादक अर्णब गोस्वामी अडचणीत आले आहेत.  मात्र, राज्य सरकारने त्यांना दिलासा देणारी भूमिका घेतली आहे. गोस्वामींवर ५ मार्चपर्यंत कारवाई करणार नाही, अशी हमी राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली आहे. 

बनावट टीआरपी प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी अडचणीत आले आहेत. या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या काही अधिकाऱ्यांना अटक झाली असून, चौकशीचा फेरा सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलचे (बीएआरसी) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली होती. गोस्वामी हे रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढवण्यासाठी दासगुप्ता यांना लाखो रुपये देत असल्याची खळबळजनक बाब तपासात समोर आली होती. 

बनावट टीआरपी प्रकरणात गोस्वामी आणि रिपब्लिक टीव्हीच्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई ५ मार्चपर्यंत करणार नाही, अशी हमी राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली आहे. न्यायालयाने ही मागणी मान्य केली असून, गोस्वामींना दिलासा दिला आहे. याचबरोबर या प्रकरणाची सुनावणी प्रत्यक्ष आणि जलद घेण्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. 

या प्रकरणात सरकार आणि गोस्वामींनी मोठ्या प्रमाणात कागदपत्रे सादर केली आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी घेताना या कागदपज्ञत्रांचा पडताळा करणे शक्य नसल्याने न्यायालय या प्रकरणाची प्रत्यक्ष सुनावणी घेणार आहे. ही सुनावणी ५ मार्चपासून सुरू होणार आहे. तोपर्यंत गोस्वामींना या प्रकरणात दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, दासगुप्तांच्या जामिनावर उच्च न्यायालयासमोर नुकतीच सुनावणी झाली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणातील सूत्रधार कोण आणि यात दासगुप्तांची भूमिका काय, असा प्रश्न उच्च न्यायालयाने विचारला. यावर सरकारी वकिलांना आरोपपत्रात दासगुप्ता हेच सूत्रधार असल्याचे सांगितले होते. यावर या प्रकरणातील मास्टरमाईंड अर्णब गोस्वामी आहेत, असे दासगुप्तांच्या वकिलांनी उच्च न्यायालयाला सांगितले होते.    

बनावट टीआरपी प्रकरणात पोलिसांनी 11 जानेवारीला पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. यात बीएआरसीच्या फॉरेन्सिक ऑडिटचाही समावेश होता. तसेच, गोस्वामी आणि दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट आणि 59 व्यक्तींचे जबाबही न्यायालयात सादर करण्यात आले आहेत. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख