मोठी बातमी : सीबीआय संचालकपदासाठी सुबोधकुमार जयस्वाल यांचे नाव आघाडीवर - maharashtra former dg subodh kumar jaiswal is frontrunner for cbi director post | Politics Marathi News - Sarkarnama

मोठी बातमी : सीबीआय संचालकपदासाठी सुबोधकुमार जयस्वाल यांचे नाव आघाडीवर

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 मे 2021

केंद्रीय अन्वेषण विभागाच्या संचालकांची निवड करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय निवड समितीची बैठक झाली. 

नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) संचालकांची (Director) निवड करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत नियमांवर बोट ठेवत केंद्र सरकारने सुचवलेल्या दोन नावांवर सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा (CJI) यांनी फुली मारली आहे. यामुळे महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल (Subodh Kumar Jaiswal) यांचे नाव आघाडीवर आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी काल (ता.24) ही उच्चस्तरीय समितीची बैठक झाली. या बैठकीला निवड समितीचे सदस्य व  सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधिर रंजन चौधरी  हे उपस्थित होते. तब्बल चार महिन्यांच्या विलंबानंतर झालेली ही बैठक सुमारे दीड तास चालली. या समितीने तीन जणांची प्राथमिक निवड केली. परंतु, सरन्यायाधीशांनी सहा महिन्यांच्या नियमावर बोट ठेवले. हा नियम याआधी कधीही सीबीआय संचालकांच्या निवडीवेळी उपस्थित झालेला नव्हता. सरन्यायाधीशांनी यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला दिला. एखाद्या अधिकाऱ्याची सेवा सेवा महिने राहिली असेल तर पोलीस सेवेच्या प्रमुखदी त्याची नियुक्ती करु नये, असा हा निर्णय आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.  

हेही वाचा : मोदी सरकारला धक्का : राकेश अस्थाना अन् वाय.सी.मोदींच्या नावावर फुली 

निवड समितीला कायद्याचे पालन करायला हवे, असे सरन्यायाधीशांनी बजावले. याला विरोधी पक्षनेते अधिर रंजन चौधरी यांनीही पाठिंबा दिला. यामुळे तीन सदस्यीस समितीत या मुद्द्याला बहुमत मिळाले. यामुळे आता महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल, सशस्त्र सीमा दलाचे (एसएसबी) महासंचालक के.आर.चंद्रा आणि गृह मंत्रालयातील विशेष सचिव व्ही.एस.के.कौमुदी यांची नावे समोर आली आहेत. या तिघांपैकी एकाची संचालकपदी निवड होणार आहे. यात जयस्वाल यांची सेवाज्येष्ठता असल्याने त्यांचे नाव आघाडीवर आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

सीबीआय संचालकपदासाठी सुमारे 109 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या नावावर चर्चा केली जाणार होती.  परंतु, बैठकीआधी सरकारने ही यादी कमी करुन केवळ 16 नावे ठेवली. नवीन सीबीआय संचालकांच्या निवडीला जवळपास चार महिन्यांचा विलंब झाला आहे. अखेर काल पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख