बाळासाहेब थोरात म्हणतात, आम्ही राहुल गांधींच्या पाठीशी!

काँग्रेस पक्षात नेतृत्वाच्या मुद्द्यावरुन जोरदार मतभेद उफाळून आले आहेत. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे नाव पुन्हा पूर्णवेळ अध्यक्षपदासाठी घेतले जात आहे.
maharashtra congress president balasaheb thorat says rahul gandhi should be party president
maharashtra congress president balasaheb thorat says rahul gandhi should be party president

नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये आता नेतृत्व बदलाच्या मुद्द्यावरुन दुफळी निर्माण झाली आहे. काही नेत्यांनी सोनिया गांधी याच अध्यक्षपदी हव्या आहेत तर काही नेत्यांनी राहुल गांधी यांचे नाव लावून धरले आहे. यातून पक्षात दोन गट पडले आहेत. काँग्रेस कार्यकारी समितीच्या उद्या(ता.२४) होणाऱ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडी घडत असून, उद्याची बैठक वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारले पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्राचे महसूलमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. 

पक्षाच्या 23 ज्येष्ठ नेत्यांनी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी संघटनात्मक रचनेत बदल  करण्यासोबत नव्या नेतृत्वाचा आग्रह धरला आहे. आम्ही सोनिया अथवा राहुल यांच्या नेतृत्वावर टीका केलेली नाही, केवळ बदलांचा आग्रह धरला असल्याचेही त्या नेत्याने सांगितले. हे पत्र या सर्व नेत्यांनी 7 ऑगस्टला सोनियांना लिहिल्याचे कळते. निवडणुकीतील पराभवानंतर त्यावर पक्षांतर्गत विचारमंथन झाले नाही. पक्षाचे नेतृत्वही जबाबदारी घेताना दिसत नाही, अशी खंतही पत्रात व्यक्त केली आहे 

दुसरीकडे राहुल गांधी यांच्या निकटवर्ती नेत्यांनी काँग्रेस कार्यकारी समितीला पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी पक्षाची धुरा ही पुन्हा राहुल यांच्याकडेच सोपवावी, अशी मागणी केली आहे. या गटाने पुन्हा राहुल यांनाच पक्षाचे अध्यक्ष केले जावे म्हणून आग्रह धरला आहे, विद्यमान खासदार मणिक्कम टागोर यांनी पुन्हा राहुल यांनाच पक्षाचे अध्यक्ष केले जावे, अशी आग्रही मागणी केली आहे. टागोर यांच्याप्रमाणेच छल्ला वामशी रेड्डी, तेलंगणमधील काही माजी आमदार आणि महाराष्ट्राच्या प्रदेश सचिवांनी राहुल यांनाच अध्यक्ष केले जावे अशी मागणी केली आहे. दरम्यान, काही खासदार आणि माजी मंत्र्यांनी सामूहिक नेतृत्वाची मागणी केली आहे. यामुळे उद्या होणारी कार्यकारी समितीची बैठक वादळी ठरणार आहे. 

याविषयी संगमनेरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, या देशाला पुरोगामी, समर्थ व  सर्वांना पुढे घेवून जाणारे नेतृत्व म्हणून खासदार राहुल गांधी यांची गरज आहे. यासाठी त्यांनी काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारण्याची आवश्यकता आहे. ही केवळ काँग्रेस पक्षाची नाही तर, देशाची गरज आहे. असे नेतृत्व केवळ राहुल गांधीच देऊ शकतात. सोनिया गांधी यांनी त्यांच्या कार्यकाळात पक्षासाठी खूप मोठे आणि चांगले काम केले आहे. एक समर्थ नेतृत्व त्यांनी दिले आहे. त्यांना हवे तोपर्यंत त्या पक्षाच्या अध्यक्षा राहू शकतात. मात्र, त्यानंतर नेतृत्व करण्यासाठी राहुल गांधी यांनी तयार राहायला हवे. आम्ही त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत.

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com