अर्णब गोस्वामी फिरसे हाजीर हो...पण ते विधिमंडळात हजर होणार का?

मुख्यमंत्र्यांसह राज्य सरकारचा अवमान केल्याप्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला होता.
maharashtra assembly summons arnab goswami in privilege motion
maharashtra assembly summons arnab goswami in privilege motion

मुंबई : मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांसह राज्य सरकारचा अवमानकारक उल्लेख केल्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव विधिमंडळात दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी गोस्वामींना उद्या (ता.3) हक्कभंग समितीसमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे. 

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री व विधिमंडळाचा अवमान केल्याबद्दल रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात मागील वर्षी ९ ऑगस्टला विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी हा ठराव मांडला होता. त्याला अर्णब गोस्वामी यांनी आव्हान सर्वोच्च न्यायालयात दिले आहे. याआधीही गोस्वामींना समन्स बजावूनही ते हजर राहिले नव्हते. त्यामुळे ते या वेळी हजर राहणार की नाही याची उत्सुकता आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्य मंत्र्यांबाबत गोस्वामी यांनी त्यांच्या वृत्तवाहिनीवर निराधार बातम्या देऊन विधिमंडळाचा अवमान करीत आहे, असा ठपका ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्री किंवा विधिमंडळ सदस्यांचा अवमान करणे किंवा त्यावर आक्षेपार्ह भाष्य केल्यामुळे हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्याची तरतूद आहे. बेजबाबदार बातम्या प्रसिद्ध करणारे आणि पुराव्याशिवाय राज्यातील कॅबिनेट मंत्र्यांवर बेछूट आरोप करणारे संपादक अर्णब गोस्वामींवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. 

बनावट टीआरपी प्रकरणात कारवाईपासून संरक्षण 
बनावट टीआरपी प्रकरणात रिपब्लिक टीव्हीसह तिचे संपादक अर्णब गोस्वामी अडचणीत आले आहेत.  मात्र, राज्य सरकारने त्यांना दिलासा देणारी भूमिका घेतली आहे. गोस्वामींवर ५ मार्चपर्यंत कारवाई करणार नाही, अशी हमी राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली आहे. 

बनावट टीआरपी प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी अडचणीत आले आहेत. या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या काही अधिकाऱ्यांना अटक झाली असून, चौकशीचा फेरा सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलचे (बीएआरसी) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली होती. गोस्वामी हे रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढवण्यासाठी दासगुप्ता यांना लाखो रुपये देत असल्याची खळबळजनक बाब तपासात समोर आली होती. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com