महाआघाडीचे गणित अखेर जुळले..काँग्रेसला 70 तर डाव्यांना 30 जागा - Mahagathbandhan finalises seat distribution in bihar assembly election | Politics Marathi News - Sarkarnama

महाआघाडीचे गणित अखेर जुळले..काँग्रेसला 70 तर डाव्यांना 30 जागा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2020

बिहारमधील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीत सत्ताधारी जेडीयू, भाजप आणि लोकजनशक्ती पक्षाच्या आघाडीसमोर आरजेडी, काँग्रेस आणि डावे पक्ष यांची महाआघाडी असे चित्र दिसणार आहे. 

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या कहर वाढत असताना बिहारमध्ये निवडणुकीचे वातावरण तापले आहे. सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू), भाजप आणि लोक जनशक्ती पक्षाच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र दिसत आहे. महाआघाडीत जागावाटपावरुन असलेला तिढा सुटला आहे. आरजेडी, काँग्रेस आणि डावे पक्ष यांच्या महाआघाडीचे जागावाटपाचे गणित अखेर जुळले आहे. 

कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे बिहारमधील विधानसभा निवडणूक या वेळी राजकीय पक्षांच्या व्हर्च्युअल प्रचारामुळे गाजणार आहे. बिहार विधानसभेची मुदत २९ नोव्हेंबरला संपत आहे. एकूण तीन टप्प्यांत ही निवडणूक होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला होणार असून, यात ७१ मतदारसंघ आहेत. दुसरा टप्पा  ३ नोव्हेंबरला असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबरला असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत.  

यंदाच्या निवडणुकीत बिहारमध्ये वेगळे राजकीय चित्र पाहायला मिळणार आहे. मागील निवडणुकीवेळी सहकारी असलेले पक्ष आता विरोधात मैदानात आहेत. मागील वेळी लालूप्रसाद यादव यांचा आरजेडी, मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा जेडीयू आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र होते. त्यावेळी भाजपने लोकजनशक्ती पक्ष, राष्ट्रीय लोकसमता पक्षासोबत आघाडी केली होती. मागील निवडणुकीच नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए)  विजय झाला होता. या विजयानंतर काही महिन्यांमध्येच नितीश यांनी लालूंच्या पक्षाची साथ सोडत भाजपसोबत आघाडी केली होती. यामुळे विरोधी बाकांवरील भाजप आणि लोक जनशक्ती पक्ष सत्तेत आला होता. 

या निवडणुकीत आरजेडी हा काँग्रेसला सोबत घेऊन महाआघाडीचे नेतृत्व करत आहे. आधी या महाआघाडीचे घटक असलेले जितनराम मांझी आता एनडीएमध्ये गेले आहेत. याचवेळी एनडीएमधील लोक जनशक्ती पक्षाने वाढीव जागा मिळाव्यात म्हणून आग्रह धरला आहे. लोक जनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी जास्त जागा मिळाव्यात म्हणून आग्रही भूमिका घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे एनडीएचे जागावाटप लांबत चालले आहे. 

आता काँग्रेस आणि आरजेडी यांच्यातही जागा वाटपावरुन तिढा निर्माण झाला होता. अखेर हा तिढा सुटला आहे. काँग्रेसला 70 जागा आणि डाव्या पक्षांना 30 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला 70 जागा मिळाल्या असल्या तरी त्या सर्व त्यांच्या पसंतीच्या असतील असे नाही, अशी अट मात्र, आरजेडीने कायम ठेवली आहे. उरलेल्या जागांवर आरजेडी लढणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख