मृत्यूस जबाबदार कोण? रुग्णालयात दाखल रुग्णाचा 'ऑक्सिजन'च काढून घेतला - in madhya pradesh hospital staff unplugged oxygen supply of covid patient | Politics Marathi News - Sarkarnama

मृत्यूस जबाबदार कोण? रुग्णालयात दाखल रुग्णाचा 'ऑक्सिजन'च काढून घेतला

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 एप्रिल 2021

देशातील कोरोना रुग्णांची वाढ चिंतेचा विषय बनली आहे. रुग्णांचे हाल होत असून, याबाबतचे धक्कादायक दररोज समोर येत आहेत. 

नवी दिल्ली : देशातील रोजची कोरोना रुग्णांची वाढ आता जगाचाही चिंतेचा विषय बनला आहे. भारत देशातील रोजच्या रुग्णवाढीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोचला आहे. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने रुग्णालये अपुरी पडत असल्याचे चित्र आहे. यातही दररोज रुग्णांचे हाल होत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. आता रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाचा ऑक्सिजन पुरवठाच काढून घेण्यात आल्याची घटना समोर आली आहे. यात अखेर त्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

ही घटना मध्य प्रदेशातील शिवपुरी येथील सरकारी रुग्णालयात घडली आहे. भोपाळपासून हे ठिकाणी 300 किलोमीटरवर आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दाखल असलेल्या रुग्णाचा ऑक्सिजन पुरवठा बंद केल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. आधी रुग्णालय प्रशासनाने आधी हा आरोप फेटाळला होता. नंतर मात्र, सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर सत्य समोर येऊन रुग्णालय प्रशासनाचा दावा खोटा ठरला आहे. 

मृत्यू झालेल्या रुग्णाच्या मुलाने याविषयी सांगितले की, माझ्या वडिलांनी मागील दोन-तीन दिवसांपासून बरे वाटत होते. ते जेवण करीत होते आणि त्यांच्या प्रकृतीतही सुधारणा होती. परंतु, रात्री रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या ऑक्सिजन पुरवठा काढून टाकला. सकाळी मला रुग्णालयातून वडिलांची प्रकृती बिघडल्याचा कॉल आला. मी रुग्णालयात पोचल्यानंतर वडिलांना ऑक्सिजन पुरवठा देण्याची मागणी कर्मचाऱ्यांना केली. त्यांनी याला नकार दिला. अखेर मी त्यांना आयसीयूमध्ये नेले. पण तिथे 15 मिनिटांतच त्यांचा मृत्यू झाला. 

रुग्णालय प्रशासनाने ऑक्सिजनचा कोणताही तुटवडा नसल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. अनंतकुमार राखोडे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमली असून, ती 48 तासांत अहवाल सादर करणार आहे. 

देशात मागील 24 तासांत दोन लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले. तर एक हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला. भारत देशातील रोजच्या रुग्णवाढीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. जगात दररोज आढळून येणाऱ्या प्रत्येक पाच कोरोनाबाधित रुग्णांमध्ये किमान एक भारतीय रुग्ण आहे. मागील आठवड्यात ब्राझीलमध्ये ही परिस्थिती होती. आता भारताने ब्राझीललाही मागे टाकले आहे. 

जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. कोरोनाबाधितांची संख्या जवळपास सव्वा तीन कोटींवर पोचली आहे. दोन दिवसांपर्यंत अमेरिकेनंतर ब्राझीलचा क्रमांक लागत होता. पण 12 एप्रिलला भारताने ब्राझीलला मागे टाकले. ब्राझीलमध्ये 12 एप्रिलला 1 कोटी 35 लाख कोरोनाबाधित होते. तर भारतात हा आकडा 1 कोटी 36 लाखांच्या पुढे गेला आहे. मागील महिनाभरात भारतात वेगाने वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे कमी कालावधीतच भारत जगातील कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेला दुसरा देश ठरला आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख