मध्य प्रदेशात काँग्रेस अन् भाजपची नव्हे तर जोतिरादित्यांच्या अस्तित्वाची लढाई - madhya pradesh byelections are battle of existance for jyotiradiya scindia | Politics Marathi News - Sarkarnama

मध्य प्रदेशात काँग्रेस अन् भाजपची नव्हे तर जोतिरादित्यांच्या अस्तित्वाची लढाई

वृत्तसंस्था
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

मध्य प्रदेशात विधानसभा पोटनिवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. जोतिरादित्य शिंदे यांच्यामुळे या निवडणुका होत असून, त्यांच्यासाठी हा अस्तित्वाचा लढा ठरणार आहे. 

भोपाळ : मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकांचा प्रचार शिगेला पोचला आहे. सत्ताधारी भाजप विरुद्ध काँग्रेस असा जोरदार सामना रंगला आहे. भाजप आणि काँग्रेससाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक असली तरी जोतिरादित्य शिंदे यांच्यासाठी हा अस्तित्वाचा लढा ठरणार आहे. काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना आता स्वत:ची क्षमता सिद्ध करावी लागणार आहे. 

मध्य प्रदेशात 28 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होत असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. जोतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत 22 आमदार काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले होते. त्यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडले होते. आता राज्यात एकूण 28 मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहेत. शिंदे यांच्या ग्वाल्हेर व चंबळ या बालेकिल्ल्यात कमलनाथ यांनी काही दिवसांपूर्वी जोरदार शक्तिप्रदर्शनही केले होते. 

मध्य प्रदेशातील राजकीय वातावरण आता पुन्हा तापू लागले आहे. राज्यात 28 विधानसभा मतदारसंघात 3 नोव्हेंबरला पोटनिवडणुका होत आहे. काँग्रेसचे सरकार पाडणाऱ्या भाजपला धडा शिकवण्यासाठी काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी कंबर कसली आहे. राज्यातील भाजप नेत्यांना फोडून ते मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.  

राज्यातील सत्ता कायम राखण्यासाठी भाजपला केवळ 9 जागा हव्या आहेत. काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी पोटनिवडणुकीतील सगळ्या जागा जिंकाव्या लागतील. यानंतर राजकीय समीकरणे बदलू शकतात. जोतिरादित्य शिंदे यांच्यावर आता मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. कारण त्यांच्यासोबत काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या 22 आमदारांना पुन्हा निवडून आणण्याची नैतिक जबाबदारी त्यांच्यावर आहे. 

जोतिरादित्य यांच्या ग्वाल्हेर आणि चंबळ या भागातील तब्बल 16 मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहे. शिंदे परिवाराचा बालेकिल्ला असलेल्या या भागात आपले वर्चस्व आहे हे शिंदे यांना आता प्रत्यक्ष सिद्ध करावे लागेल. याचमुळे शिंदे या भागातील प्रचार सभांमध्ये बोलताना ही निवडणूक केवळ काँग्रेस आणि भाजपच्या प्रतिष्ठेची नसून, ग्वाल्हेर आणि चंबळच्या प्रतिष्ठेची असल्याचे म्हणत आहेत. शिंदे यांना येथे केवळ काँग्रेसचे आव्हान नसून, बहुजन समाज पक्षही मैदानात आहे. यामुळे त्यांची डोकेदुखी वाढली आहे. 

भाजप नेत्या उमा भारती यांचे शिंदे घराण्याशी संबंध राजमाता विजयाराजे यांच्यापासून आहेत. यामुळे उमा भारती येथे जोतिरादित्य यांच्यासाठी मैदानात उतरल्या आहेत. सर्वसाधारणपणे पोटनिवडणुका लादलेल्या असतील तर जनता नाखूष असते. विशेषत: आमदाराने पक्षांतर केले असेल तर याचा मोठा फटका बसतो. यामुळे शिंदे हे जोरदारपणे प्रचार करताना दिसत आहेत. भाजपमधील त्यांची किंमत ही निवडणूक ठरवणार आहे.  

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख