हैदराबादमध्ये कमी झालेला मतदानाचा टक्का टीआरएस की भाजपच्या पथ्यावर..? - lukeworm response of voters in ghmc polls in hyderabad | Politics Marathi News - Sarkarnama

हैदराबादमध्ये कमी झालेला मतदानाचा टक्का टीआरएस की भाजपच्या पथ्यावर..?

वृत्तसंस्था
मंगळवार, 1 डिसेंबर 2020

हैदराबाद महापालिकेसाठी आज मतदान झाले. मतदानाची कमी झालेली टक्केवारी पाहता सत्ताधारी टीआरएसचे पारडे जड राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

हैदराबाद : हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज केवळ 42 टक्के मतदान झाले. मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात अनुत्साह दिसून आला. ही महापालिका निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसह राष्ट्रीय पातळीवरील अनेक नेत्यांना भाजपने प्रचारात उतरवले होते. परंतु, मतदारांमध्येच मतदानाचा अनुत्साह दिसून आला. यामुळे कमी झालेला मतदानाचा टक्का सत्ताधारी तेलंगण राष्ट्र समितीच्या (टीआरएस) की भाजपच्या पथ्यावर पडणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. 

हैदराबाद महापालिकेच्या 150 पैकी 149 विभागात आज मतदान झाले. एका विभागात मतदाराचे चिन्ह चुकीचे असल्याने मतदान रद्द करण्यात आले. मतदारांनी आज मतदानासाठी फारसा उत्साह दाखवला नाही. मतदान संपतेवेळी सायंकाळी 6 वाजता मतदानाची  प्राथमिक टक्केवारी 42 टक्के होती. त्यात किरकोळ वाढ अंतिम आकडा आल्यानंतर होऊ शकते. मागील महापालिका निवडणुकीत 2016 मध्ये मतदानाची आकडेवारी 45.27 टक्के होती. 

मतदानाची आकडेवारी कमी होण्यामागे कोरोनाचे कारण सांगितले जात आहे. मात्र, मतदानाचा कमी झालेला टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. मतदान कमी झाल्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी टीआरएसचे पारडे जड राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. भाजपने या निवडणुकीसाठी जोर लावला होता. आता निकालानंतर पक्षाला कितपत यश मिळते हे स्पष्ट होईल. 

महापालिका निवडणुकीचा निकाल ४ डिसेंबरला जाहीर होणार आहे. भाजपने नुकतीच डुब्बक विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीची एक जागा जिंकली आहे. भाजपचे उमेदवार रघुनंदन राव यांनी तेलंगण राष्ट्र समितीच्या (टीआरएस) सोलिपेटा सुजाता यांचा 1 हजार 470 मतांनी पराभव केला होता. यामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला असून, महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.  

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा प्रचारात उतरले होते. त्यांनी वादग्रस्त भाग्यलक्ष्मी मंदिरापासून प्रचाराचा सुरवात केली होती. हे मंदिर हैदराबादमधील प्रसिद्ध चारमिनारच्या पायथ्याशी आहे. भारतीय पुरातत्व विभागाने या मंदिराचे बांधकाम अवैध ठरवले होते. तसेच, उच्च न्यायालयानेही या मंदिराचा विस्तार करण्यास मनाई घातली होती. याचबरोबर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही प्रचार केला होता. 

हैदराबाद महापालिकेसाठी टीआरएसने सगळ्या 150 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. याचवेळी भाजप 149, काँग्रेस 146, तेलगू देसम पक्ष (टीडीपी) 106, एआयएमआयएम 51, डावे पक्ष 29 जागांवर निवडणूक लढत आहेत. मागील 2016 च्या निवडणुकीत टीआरएसने 99 जागांवर विजय मिळवून सत्ता स्थापन केली होती. यावेळीही टीआरएसने सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख