खासदार मोहनभाई डेलकरांची 15 पानी 'सुसाईड नोट' अन् त्यात काही जणांची नावेही... - loksabha mp mohanbhai delkar had written 15 page suicide note | Politics Marathi News - Sarkarnama

खासदार मोहनभाई डेलकरांची 15 पानी 'सुसाईड नोट' अन् त्यात काही जणांची नावेही...

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021

दादरा नगर हवेलीतील अपक्ष खासदार मोहनभाई डेलकर यांनी मुंबईतील हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याचा प्रकार घडला होता. आता त्यांची सुसाईट नोट समोर आली आहे. 

मुंबई : दादरा नगर हवेलीतील अपक्ष खासदार मोहनभाई डेलकर यांनी मुंबईतील मरिन ड्राईव्ह येथील हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होती. डेलकर यांच्या आत्महत्येने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. डेलकर यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली 15 पानी सुसाईड नोट पोलिसांना सापडली आहे. यात काही जणांची नावे आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

डेलकर हे गळफास घेतलेल्या अवस्थेत हॉटेलमधील खोलीत आढळून आले. ते 58 वर्षांचे होते. त्यांनी आत्महत्येपूर्वी गुजराती भाषेत लिहिलेली 15 पानी चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. यात काही जणांची नावे आहेत. ही चिठ्ठी कोणाला उद्देशून नाही मात्र, त्यात काही जणांची नावे आहेत. पोलिसांनी ही नावे अद्याप उघड केलेली नाहीत. या चिठ्ठीत नावे असलेल्या सर्व व्यक्तींची पोलीस चौकशी करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

डेलकर यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला होता. उत्तरीय तपासणीनंतर त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर आले असून, त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी पोलिसांना प्राथमिक माहितीच्या आधारे अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. 

डेलकर हे शेतकरी होते. त्यांचे सर्वच पक्षांतील नेत्यांशी चांगले संबंध होते. याचबरोबर सप्टेंबलर 2019 मध्ये त्यांची मनुष्यबळ, नागरी तक्रार निवारण, कायदा व न्याय याविषयीच्या संसदीय समितीवर निवड झाली होती. तसेच, ते गृह मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्यही होते. 

हेही वाचा : खासदार डेलकरांचे शेवटचे ट्विट अमित शहांना शुभेच्छा देणारे 

डेलकर यांच्या आत्महत्येमुळे मोठी खळबळ उडाली आहे. डेलकर हे आधी काँग्रेसमध्ये होते. त्यांनी अपक्ष म्हणून दादरा-नगर हवेलीतून 2019 मध्ये लोकसभेची निवडणूक लढवली होती. यात त्यांनी भाजपच्या नथुभाई पटेल यांचा पराभव केला होता. त्यांनी 9 हजार 1 मतांनी विजय मिळवला होता. त्याआधी पटेल यांनी दोन वेळा डेलकर यांचा 2009 आणि 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत पराभव केला होता. तिसऱ्या वेळी मात्र, 2019 मध्ये डेलकर यांनी या पराभवाचा वचपा काढला होता. 

हेही वाचा : खासदार मोहनभाई डेलकरांची मुंबईतील हॉटेलमध्ये आत्महत्या

2009 आणि 2014 मध्ये डेलकर यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. मात्र, नंतर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीआधीच डेलकर काँग्रेसपासून दूर झाले होते. काँग्रेसचे उमेदवार प्रभू टोकिया यांना मागील लोकसभा निवडणुकीत केवळ 8 हजार 608 मते मिळाली होती. डेलकर हे आदिवासी नेते होते आणि त्यांना दादरा-नगर हवेलीचे लोकसभेत तब्बल सात वेळा प्रतिनिधित्व केले आहे. डेलकर यांच्या मागे पत्नी कलाबेन आणि अभिनव व दिविता ही अपत्ये आहेत.  

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख