खासदार मोहनभाई डेलकरांचे शेवटचे ट्विट अमित शहांना शुभेच्छा देणारे...

दादरा नगर हवेलीतील अपक्ष खासदार मोहनभाई डेलकर यांची मुंबईतील हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.
lok sabha mp mohan delkar last tweet was birthday wishes for amit shah
lok sabha mp mohan delkar last tweet was birthday wishes for amit shah

मुंबई : दादरा नगर हवेलीतील अपक्ष खासदार मोहनभाई डेलकर यांनी मुंबईतील मरिन ड्राईव्ह येथील हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डेलकर यांच्या आत्महत्येने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सर्वच पक्षातील नेत्यांशी चांगले संबंध असलेल्या डेलकरांचे शेवटचे ट्विट हे केंद्रीय गृहमंत्री व भाजप नेते अमित शहा यांना शुभेच्छा देणारे होते. 

डेलकर हे गळफास घेतलेल्या अवस्थेत हॉटेलमधील खोलीत आढळून आले. ते 58 वर्षांचे होते. त्यांनी आत्महत्येपूर्वी गुजराती भाषेत लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण पोलिसांनी उघड केलेले नाही. त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. उत्तरीय तपासणीनंतर त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येईल, असे पोलिसांनी म्हटले आहे. 

डेलकर हे शेतकरी होते. त्यांचे सर्वच पक्षांतील नेत्यांशी चांगले संबंध होते. याचबरोबर सप्टेंबलर 2019 मध्ये त्यांची मनुष्यबळ, नागरी तक्रार निवारण, कायदा व न्याय याविषयीच्या संसदीय समितीवर निवड झाली होती. तसेच, ते गृह मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्यही होते. 

डेलकर यांचे शेवटचे ट्विट हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होते. हिंदीतून 22 ऑक्टोबर 20202 रोजी केलेल्या या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले होते, 'आपके जन्म दिवस पर ढेर सारी शुभकामनाएं। प्रभु से प्रार्थना करता हूं कि आपका स्वास्थ्य स्वस्थ रहे तथा आपकी देश सेवा निरंतर जारी रहे!' 

डेलकर यांच्या आत्महत्येमुळे मोठी खळबळ उडाली आहे. डेलकर हे आधी काँग्रेसमध्ये होते. त्यांनी अपक्ष म्हणून दादरा-नगर हवेलीतून 2019 मध्ये लोकसभेची निवडणूक लढवली होती. यात त्यांनी भाजपच्या नथुभाई पटेल यांचा पराभव केला होता. त्यांनी 9 हजार 1 मतांनी विजय मिळवला होता. त्याआधी पटेल यांनी दोन वेळा डेलकर यांचा 2009 आणि 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत पराभव केला होता. तिसऱ्या वेळी मात्र, 2019 मध्ये डेलकर यांनी या पराभवाचा वचपा काढला होता. 

2009 आणि 2014 मध्ये डेलकर यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. मात्र, नंतर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीआधीच डेलकर काँग्रेसपासून दूर झाले होते. काँग्रेसचे उमेदवार प्रभू टोकिया यांना मागील लोकसभा निवडणुकीत केवळ 8 हजार 608 मते मिळाली होती. डेलकर हे आदिवासी नेते होते आणि त्यांना दादरा-नगर हवेलीचे तब्बल सात वेळा प्रतिनिधित्व केले आहे. डेलकर यांच्या मागे पत्नी कलाबेन आणि अभिनव व दिविता ही अपत्ये आहेत.  

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com