राजकारण पेटलं अन् पुन्हा एकदा काकाने केला पुतण्याचा घात - lok janshakti party five mp revolt against chirag paswan | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

राजकारण पेटलं अन् पुन्हा एकदा काकाने केला पुतण्याचा घात

वृत्तसंस्था
सोमवार, 14 जून 2021

लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांना मोठा धक्का बसला आहे.

पाटणा : लोक जनशक्ती पक्षाचे (Lok Janshakti Party) अध्यक्ष चिराग पासवान (Chirag Paswan) यांना मोठा धक्का बसला आहे. चिराग पासवान यांच्याविरोधात पक्षाच्या पाच खासदारांनी (MP) बंड (Revolt) केले आहे. त्यांनी लोकसभेमध्ये (Loksabha) आपला वेगळा गट स्थापन करण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिले आहे. याचे सूत्रधार त्यांचे काका पशुपतीकुमार पारस हे असून, काकानेच पुतण्याविरोधात बंड केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे बिहारमधील राजकारण पेटले आहे.  
 
लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांचे मागील वर्षी निधन झाले. त्यानंतर पक्षाची धुरा त्यांचे पुत्र चिराग पासवान यांच्याकडे आली. आता रामविलास पासवान यांच्या निधनानंतर वर्षभरातच पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे. ही फूट पाडण्याचे सूत्रधार दुसरे-तिसरे कुणी नसून, चिराग यांचे काका पशुपतीकुमार पारस आहेत. पशुपती हे रामविलास यांचे लहान बंधू आहेत. 

पक्षाच्या सहापैकी पाच खासदारांनी बंड केल्याने चिराग यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे त्यांनी दिल्लीत या राजकीय घडामोडी सुरू असताना तातडीने काका पशुपतींचे घर गाठले. परंतु त्यांचे काका घराबाहेर आलेच नाही. त्यामुळे काही काळ मोटारीत प्रतीक्षा करुन चिराग तेथून परतले. 

हेही वाचा : आणखी एक घोटाळा, असं सुचेता दलाल यांचं ट्विट अन् शेअर बाजारात खळबळ 

पशुपती आणि चिराग यांच्यात मागील काही काळापासून बेबनाव आहे. ते अनेक दिवसांपासून एकमेकांशी बोलत नसून, ते पत्रव्यवहाराद्वारे संवाद साधत आहेत. पशुपती हे पहिल्यांदाच खासदार म्हणून हांजीपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. आता या काका आणि पुतण्याच्या वादामुळे बिहारमधील राजकारण ढवळले गेले आहे. 

लोक जनशक्ती पक्षाच्या खासदारांनी त्यांचा लोकसभेत वेगळा गट मानावा, अशी मागणी केली आहे. चिराग पासवान यांच्याऐवजी दुसरा नेता नेमण्याची मागणी त्यांनी केली आहे.  चिराग यांच्याविरूद्ध बंड केलेले खासदार म्हणजे पशुपती पारस पासवान (काका), प्रिन्स राज (चुलत भाऊ), चंदन सिंह, वीणा देवी आणि मेहबूब अली केशर. बिहार विधानसभा निवडणुकीच्या काळापासून हे सर्व खासदार चिराग पासवान यांच्यावर नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख