केंद्रीय मंत्रिमंडळात चिराग पासवान अन् राज्यसभेवर रीना पासवान..? - ljp affiliated organisation demands inclusion of chirag paswan in union cabinet | Politics Marathi News - Sarkarnama

केंद्रीय मंत्रिमंडळात चिराग पासवान अन् राज्यसभेवर रीना पासवान..?

वृत्तसंस्था
रविवार, 11 ऑक्टोबर 2020

लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांचा राजकीय वारसा आता त्यांचे पुत्र चिराग यांच्याकडे आला आहे. चिराग यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. 

नवी दिल्ली : लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक व केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्यानंतर त्यांचे पुत्र चिराग यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे. याचबरोबर पासवान यांच्या पत्नी रीना यांना राज्यसभेवर घ्यावे, अशीही मागणी करण्यात येत आहे. यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे   

रामविलास पासवान (वय 74) यांचे 8 ऑक्टोबरला निधन झाले. त्यांच्यावर काल सरकारी इतमामात अंत्यसस्कार करण्यात आले होते. त्यांचा राजकीय वारसा त्यांचे पुत्र चिराग हे चालवत आहेत. पासवान यांनी स्थापन केलेल्या लोक जनशक्ती पक्षाची धुराही चिराग हेच सांभाळत आहेत. 

एनडीएमधून लोक जनशक्ती पक्ष (एलजेपी)  बिहारच्या विधानसभा निवडणुकीपुरता बाहेर पडला आहे. चिराग पासवान यांनी राष्ट्रीय स्तर आणि लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. परंतु, बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पातळीवर जेडीयूसोबत वैचारिक मतभेद असल्याचे कारण देत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. चिराग यांनी भाजपला पाठिंबा आणि जेडीयूला विरोध करण्याची भूमिका घेतली आहे.  

पासवान यांनी अनुसूचित जातींसाठी दलित सेना ही संघटना स्थापन केली होती. या दलित सेनेने चिराग पासवान यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करावा, अशी मागणी केली आहे. ही संघटना लोक जनशक्ती पक्षाशी संलग्न आहे. रामविलास पासवान यांचे पुतणे प्रिन्स राज यांच्याकडे या संघटनेचे  नेतृत्व आहे. याआधी प्रिन्स यांचे पिता रामचंद्र पासवान या संघटनेची धुरा सांभाळत होते.

या विषयी बोलताना दलित सेनेचे प्रवक्ते लल्लन चंद्रवंशी म्हणाले की, केंद्रीय मंत्रिमंडळात चिराग यांचा समावेश करावा, अशी मागणी आम्ही केली आहे. याचबरोबर पासवान यांच्या पत्नी रीना यांना राज्यसभेवर घ्यावे, अशीही आमची मागणी आहे. पासवान यांचे खरे वारसदार चिराग हेच आहेत. आम्ही केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक आहोत. आता भाजपनेच आमच्या मागण्यांवर निर्णय घ्यायचा आहे. 

मागील वर्षी लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रीय मंत्रिमंडळात चिराग यांचा समावेश व्हावा, यासाठी रामविलास पासवान आग्रही होते. यासाठी त्यांनी स्वत:ला मंत्रिपद नको, अशी भूमिका घेतली होती. मात्र, भाजपने याला नकार दिला होता. केंद्रीय मंत्रिमंडळात दलित समाजाचा चेहरा असणारा मोठा नेता हवा, असे भाजपने त्यावेळी म्हटले होते. त्यामुळे चिराग यांचा केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेश हुकला होता. आता मात्र, चिराग यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात प्रवेश व्हावा यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख