भाजपला धक्का...येडियुरप्पा सत्तेतून गेले अन् महिनाभरातच लिंगायत समाज विरोधात

मुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीतून येडियुरप्पा मुक्त होऊन महिनाभरातच राज्यातील लिंगायत समाजाने भाजप सरकारला इशारा दिला आहे. येडियुरप्पा हे या समाजाचे नेतृत्व करणारे नेते आहेत.
ligayat community puts up pressure on karnataka government
ligayat community puts up pressure on karnataka government

बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) आले आहेत. मुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीतून येडियुरप्पा मुक्त होऊन महिनाभरातच राज्यातील लिंगायत समाजाने (Lingayat Community) भाजप सरकारला इशारा दिला आहे. येडियुरप्पा हे या समाजाचे नेतृत्व करणारे नेते आहेत. 

लिंगायत समाजात बोम्मई यांना येडियुरप्पांएवढी मान्यता नाही. येडियुरप्पांनी मुख्यमंत्रिपद सोडताच या समाजाने सरकारची कोंडी करण्यास सुरवात केली आहे. भाजपची व्होटबँक असलेल्या या समाजाने आणखी आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. सहा महिन्यांपूर्वीच लिंगायत समाजाला आरक्षण देण्यात आले होते. आता यासाठी आंदोलनाचीही तयारी करण्यात आली आहे. राज्यातील लिंगायत समाजामध्ये पंचमशाली हे 70 टक्के आहेत. सरकारने 2 अ ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी लावून धरली असून, यासाठी महिनाभर आंदोलन केले जाणार आहे.  

बागलकोट जिल्ह्यातील कुडाळसंगम येथील पंचमशाली मठाचे महंत यासाठी जनजागृती मोहीम हाती घेणार आहेत. प्रतिज्ञा पंचायत ही मोहीम आजपासून (26 ऑगस्ट) 30 सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. राज्यातील प्रत्येक तालुका मुख्यालयात अशा प्रकारचे जनजागृती मेळावे घेतले जाणार आहेत. सर्व लिंगायत समाज एकत्र येऊन सरकारवर आणखी आरक्षणासाठी दबाव आणेल, अशी रणनीती आखण्यात आली आहे. सध्या लिंगायत समाजाला 5 टक्के आरक्षण असून, ते वाढवण्याची मागणी होत आहे. 

येडियुरप्पांना मुख्यमंत्रिपदावरुन हटवण्यासाठी पक्ष नेतृत्वाने हालचाली सुरू केल्यानंतर त्यांनी लिंगायत मठांच्या प्रमुखांना पाठीशी उभे केले होते. मुख्यमंत्र्यांना हटवल्यास राज्यातील लिंगायत समाजात असंतोष निर्माण होईल, असा दबाव त्यांनी पक्ष नेतृत्वावर आणला होता. त्यावेळी येडियुरप्पांनी लिंगायत कार्ड खेळले होते. राज्यातील लिंगायत समाजाचे नेतृत्व म्हणून येडियुरप्पांना पाहिले जाते. पक्षीय भिंती ओलांडूनही अनेक पक्षांतील नेते लिंगायत नेते म्हणून येडियुरप्पांना मान्यता देतात. 

त्यावेळी येडियुरप्पांनी राज्यातील लिंगायत मठांच्या प्रमुखांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर सर्व मठाधिपतींनी येडियुरप्पा यांना मुख्यमंत्री पदावरुन हटवू नये, असा इशारा भाजप नेतृत्वाला दिला होता. अखेर पक्ष नेतृत्वाने त्यांना राजीनामा देण्यास सांगितल्याने ते पायउतार झाले होते. परंतु, मुख्यमंत्रिपदी बोम्मई हा लिंगायत चेहराच निवडण्यात आला. येडियुरप्पांच्या पसंतीनेच बोम्मईंची निवड झाली होती. 

येडियुरप्पांच्या रुपाने दक्षिणेत भाजपचा पहिला मुख्यमंत्री झाला होता. येडियुरप्पांची मुख्यमंत्रिपदाची ही चौथी टर्म होती. त्यांच्या चौथ्या टर्ममधील मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात येडियुरप्पांनी राजीनाम्याची घोषणा केली होती. त्यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी बोम्मई यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. बोम्मई हे येडियुरप्पा यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. येडियुरप्पा यांच्या संमतीनेच त्यांची निवड झाली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com