कंगनाचे जे काही सुरूय ते स्वत:साठीच; विकाससिंह यांचा खुलासा - lawyer vikas singh clarifies about actress kangana ranaut allegation against bollywood | Politics Marathi News - Sarkarnama

कंगनाचे जे काही सुरूय ते स्वत:साठीच; विकाससिंह यांचा खुलासा

वृत्तसंस्था
शनिवार, 22 ऑगस्ट 2020

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी सीबीआयने वेगाने तपास सुरू केला आहे. सीबीआयने आज सिद्धार्थ पिठाणी आणि नीरज यांची चौकशी केली. 

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सुरू केला आहे. या प्रकरणातील दोन महत्वाचे साक्षीदार सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणी आणि स्वयंपाकी नीरज या दोघांना घेऊन सीबीआयचे पथक आज सुशांतच्या बांद्य्रातील निवासस्थानी आज गेले होते. दरम्यान, सुशांतच्या वडिलांचे वकील विकाससिंह यांनी आता अभिनेत्री कंगना राणावत हिच्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. 

सुशांतच्या मृत्यूप्रकरणी त्याचे पिता के.के.सिंह पाटण्यातील राजीवनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. यानंतर तपासावरून महाराष्ट्र आणि बिहार सरकार एकमेकांविरोधात उभे राहिल्याचे चित्र निर्माण झाले होते. दोन राज्यांचे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असताना यात सक्त वसुली संचालयानेही (ईडी) उडी घेतली होती. सुशांतचा मृत्यू आणि आर्थिक अनियमतितेप्रकरणी ईडीने रिया हिच्यासह सहा जणांवर करचुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) या प्रकरणी रिया चक्रवर्ती, तिचे पिता इंद्रजित, आई संध्या, भाऊ शोविक, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युएल मिरांडा आणि बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी यांच्यावर एफआयआर दाखल केला आहे. 

सीबीआयचे 15 जणांचे पथक मुंबईत तपासासाठी 20 ऑगस्टला दाखल झाले आहे. सीबीआयचे पथक सांताक्रूज येथील हवाई दलाच्या गेस्ट हाऊसवर थांबले आहे. सीबीआय पथकाने चौकशी सुरू केली आहे. सीबीआय पथकाने प्रथम सुशांतचा स्वयंपाकी नीरज याची चौकशी केली. यानंतर पथकाने मुंबईचे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर हे पथक बांद्रा पोलीस ठाण्यात गेले होते. या प्रकरणाशी निगडित कागदपत्रे सीबीआयने मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेतली आहेत. सीबीआयने सुशांतचे शवविच्छेदन करणाऱ्या कूपर रुग्णालयातील डॉक्टरांचीही चौकशी केली आहे. 

सुशांतच्या मृत्यू झाला त्यावेळी 14 जूनला घरात उपस्थित असलेल्यांमध्ये सिद्धार्थ पिठाणी आणि नीरज यांचा समावेश होता. सिद्धार्थ याची आधी ईडीनेही चौकशी केली होती. नीरज  याची सीबीआयने आज सलग दुसऱ्या दिवशी चौकशी केली. त्यानंतर सीबीआयचे पथक सिद्धार्थ आणि नीरज या दोघांना घेऊन सुशांतच्या बांद्य्रातील घरी गेले. याचबरोबर सुशांतच्या मृत्यूवेळची परिस्थिती पुन्हा सीबीआयच्या फोटो आणि सायंटिफिक डिव्हिजनच्या सेंट्रल फॉरेन्सिक लॅबोरेटरीचे पथकाने निर्माण केली. पुन्हा एकदा सगळ्या घटनांचा क्रम सीबीआयने तपासला आहे. यातून नवीन काही धागेदोरे हाती लागतात का हे सीबीआय पथक पाहत आहे. यातून सुशांतची आत्महत्या की काही घातपात झाला हेही तपासण्यात येत आहे. रात्री उशिरा सीबीआयचे पथक या दोघांना घेऊन सुशांतच्या घरातून बाहेर पडले. 

कंगनाने या प्रकरणी बॉलीवूडमधील घराणेशाहीला जबाबदार धरुन अनेक जणांवर आरोप केले होते. सुशांतच्या वडिलांचे वकील विकाससिंह यांनी आता अभिनेत्री कंगना राणावत हिच्याबाबत खुलासा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, कंगनाने मांडलेले मुद्दे बरोबर असतील. सुशांतलाही घराणेशाहीचा त्रास होत असेल. मात्र, कंगना ही सुशांतचे प्रतिनिधित्व करीत नाही. ती जे काही करीत आहे ते तिच्यासाठीच करीत आहे. कंगनाचे ज्यांच्याशी वैर होते त्यांनी ती लक्ष्य करीत आहे. सुशांत प्रकरणात या मुद्द्याला प्राधान्य नाही. यात रिया चक्रवर्ती आणि तिच्या गँगने सुशांतला कसे संपविले हाच महत्वाचा मुद्दा आहे.

सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत होते. या प्रकरणी पोलिसांनी 56 जणांचे जबाब नोंदविले होते. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा समावेश होता. 

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख