मोठा दिलासा : भारतात 27 दिवसांत पहिल्यांदाच असं घडलं! - in last 27 days first time india daily covid cases falls below 3 lakhs | Politics Marathi News - Sarkarnama

मोठा दिलासा : भारतात 27 दिवसांत पहिल्यांदाच असं घडलं!

वृत्तसंस्था
सोमवार, 17 मे 2021

देशातील कोरोनाचा कहर कायम असला तरी रुग्णसंख्येत काही प्रमाणात घट होऊ लागली आहे. मात्र, रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अजूनही जास्त आहे. 

नवी दिल्ली : देशातील कोरोना (Covid19)  रुग्णसंख्येतील (Patients) वाढ सुरूच असली तरी या वाढीचा वेग आता कमी होऊ लागला आहे. देशात 21 एप्रिलनंतर प्रथमच नवीन रुग्णसंख्या 3 लाखांच्या खाली आली आहे. देशात आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 2 लाख  81  हजार 386 नवीन रुग्ण सापडले असून, 4 हजार 106 जणांचा मृत्यू (Covid Deaths) झाला आहे. 

देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 2 कोटी 49 लाख 65 हजार 463 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 74 हजार 390 झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. रुग्णसंख्या कमी होत असून 27 दिवसांनंतर प्रथमच रोजची रुग्णसंख्या 3 लाखांच्या खाली आली आहे. तरीही मृत्यूचा आकडा वाढत असून, याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. 

हेही वाचा : नगरच्या आयुक्तांचा घूमजाव; शहरात पुन्हा कडक लॉकडाउन 

देशातील सक्रिय रुग्णांची संख्या कमी होऊ लागली असून, आता ती 35 लाखांवर आली आहे. सक्रिय रुग्णांची जास्त असल्याने देशातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला आहे. यामुळे रुग्णांसाठी रुग्णालये अपुरी पडू लागल्याचे चित्र आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 35 लाख 16 हजार 997 असून, एकूण बाधितांमध्ये याचे प्रमाण 14.09 टक्के आहे. देशात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 84.81 टक्के आहे. देशात बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 2 कोटी 11 लाख 74 हजार 76 आहे. याचवेळी मृत्यूदर 1.10 टक्के आहे. 

देशातील कोरोना रुग्णसंख्या वाढीचे टप्पे 
20 लाख : 7 ऑगस्ट  (2020) 
30 लाख : 23 ऑगस्ट  
40 लाख : 5 सप्टेंबर  
50 लाख : 16 सप्टेंबर 
60 लाख : 28 सप्टेंबर 
70 लाख : 11 ऑक्टोबर  
80 लाख : 29 ऑक्टोबर  
90 लाख : 20 नोव्हेंबर 
1 कोटी : 19 डिसेंबर 
1.5 कोटी : 19 एप्रिल (2021)  
2 कोटी : 4 मे 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख