पुण्यातील कोविड सेंटर "बडा घर पोकळ वासा.."  - Lack of facilities at Kovid Center in Pune  | Politics Marathi News - Sarkarnama

पुण्यातील कोविड सेंटर "बडा घर पोकळ वासा.." 

उमेश घोंगडे
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

जेमतेम चाळीस व्हेंटिलेटरवर सध्या हे जम्बो कोविड सेंटर सुरू आहे. येथे तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव आहे.

पुणे : मोठी घोषणा करून पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सुरू करण्यात आलेल्या आठशे रूग्ण क्षमतेच्या पुण्यातील कोविड सेंटरमध्ये सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांअभावी पोकळ वासा ठरत आहे. सहाशे ऑक्सिजन बेड तसेच दोनशे व्हेंटिलेटरसह हे सेंटर सुसज्ज करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, पुरेसा ऑक्सिजन तसेच जेमतेम चाळीस व्हेंटिलेटरवर सध्या हे जम्बो कोविड सेंटर सुरू आहे. मात्र, येथे तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव आहे.

पुण्यात वाढणारी रूग्णसंख्या लक्षात घेऊन पुण्यात आणि पिंपरीत मोठ्या क्षमतेचे कोविड सेंटर सुरू करण्याची घोषणा करून पुण्यातील सेंटर तातडीने सुरू करण्यात आले. पालकमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड सेंटर तातडीने सुरू झाले. मात्र, यासाठी लागणाऱ्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. पुण्यात गंभीर रूग्णांसाठी लागणाऱ्या रूग्णवाहिकांचीदेखील कमतराता आहे. पत्रकार पांडुरंग रायकर यांना वेळेत ऑक्सिजन तसचे रूग्णवाहिका न मिळाल्याने मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने पुण्यातील आरोग्य व्यवस्था आज हादरली. 

जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त जबाबदार 
जम्बो सेंटरमधील त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. पीएमआरडीएच्यावतीने हे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. या कामात पुणे महापालिकेला पूर्णपणे बाजूला ठेवण्यात आले असून एकूण खर्चाच्या २५ टक्के निधी देण्याची जबाबदारी महापालिकेवर आहे. या पलिकडे या सेंटरच्या सर्व उभारणीत महापालिकेचा सहभाग ठेवण्यात आलेला नाही. या सेंटरमध्ये पुरेशा साधन सामग्रीचा या अभावाला पुण्याचे जिल्हाधिकारी, पीएमआरडीएचे आयुक्त तसेच पुण्याचे विभागीय आयुक्त जबाबदार आहेत.

संबंधित लेख