बाबरी निकालाचे लालकृष्ण अडवानींनी केले 'असे' स्वागत - L K Advani welcomed the court verdict by chanting jai shri ram | Politics Marathi News - Sarkarnama

बाबरी निकालाचे लालकृष्ण अडवानींनी केले 'असे' स्वागत

वृत्तसंस्था
बुधवार, 30 सप्टेंबर 2020

बाबरी पाडल्याप्रकरणी न्यायालयाने लालकृष्ण अडवानींसह 32 जणांची मुक्तता केली आहे. या निकालाचे अडवानी यांनी स्वागत करुन आनंद व्यक्त केला आहे.  

नवी दिल्ली : बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांच्यासह 32 जणांची केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) न्यायालयाने आज निर्दोष मुक्तता केली आहे. या निकालावरुन आता मोठा गदारोळ उडाला आहे. या खटल्यातून मुक्तता झाल्यानंतर अडवानी यांनी या निर्णयाचे जोरदार स्वागत केले आहे. 

अयोध्येत 6 डिसेंबर 1992 रोजी लाखो कारसेवकांच्या उपस्थित बाबरी मशीद पाडण्यात आली होती. त्यावेळी देशात काँग्रेसचे सरकार होते आणि पी. व्ही. नरसिंह राव हे पंतप्रधान होते. अयोध्येत वादग्रस्त जागेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी निकाल दिला होता. त्यानंतर राम मंदिर भूमिपूजनचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला होता. वास्तविक राम मंदिराबाबत निकाल लागल्याने आजचा निकालही अपेक्षित होता, अशा प्रतिक्रिया उमटल्या आहेत. 

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) न्यायालयासमोर  351 साक्षीदार आणि सुमारे 600 कागदपत्रे पुरावा म्हणून सादर केली होती. न्यायालयात 48 जणांविरोधात आरोप निश्‍चित करण्यात आले. मात्र, त्यापैकी 16 जणांचा खटला सुरु असताना मृत्यू झाला आहे. सोळाव्या शतकातील ही मशीद पाडण्यासाठी आरोपींनी कारस्थान रचले आणि कारसेवकांना मशीद पाडण्यासाठी चिथावणी दिली, असा आरोप सीबीआयने ठेवला होता. 

अडवानी आणि मुरली मनोहर जोशी यांना प्रकृतीच्या कारणास्तव आज गैरहजर राहण्याची मुभा देण्यात आली होती. उमा भारती यांना कोरोनाची लागण झाली असून, कल्याणसिंह सध्या प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल आहेत. आज एकूण 16 आरोपी न्यायालयात  हजर होते. यामध्ये साध्वी ऋतंभरा, चंपत राय, विनय कटियार, ब्रिजमोहन शरणसिंह आणि इतर काही जणांचा समावेश होता.  

अडवानी यांनी देशभरात 1992 मध्ये रथयात्रा काढून राम मंदिरासाठी वातावरण निर्मिती केली होती. अडवानी यांच्या या रथयात्रेमुळे देशभरात भाजप केंद्रस्थानी आला होता. राम मंदिर आंदोलनाचे अडवानी हे चेहरा होते. बाबरी मशीद पाडली जाण्याआधी अडवानी यांनी इतर नेत्यांनी भाषणे केली होती. या नेत्यांच्या प्रभोक्षक भाषणांमुळे संतप्त झालेल्या जमावाने बाबरी मशीद पाडली, असा आरोप सीबीआयने ठेवला होता. 

अडवानी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घरातूनच हा निकाला पाहिला. न्यायालयाचा निकाल जाहीर झाल्यानंतर घराबाहेर येऊन अडवानी यांनी 'जय श्रीराम'चा नारा देत आनंद साजरा केला. ते म्हणाले की, आपल्या सर्वांसाठी हा आनंदाचा क्षण आहे. सर्वोच्च रामजन्मभूमीबाबत दिलेला निकाल आणि त्यानंतर आलेला हा निकाल आशीर्वाद मिळाल्यासारखा आहे. अयोध्येत राम मंदिर बनवण्याचे खूप काळापासून पाहिलेले स्वप्न अखेर साकार होत आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख