कोरोनाचा उद्रेक : कुंभमेळ्यात दोन दिवसांत तब्बल एक हजार भाविकांना संसर्ग - in kumbh more than one thousand covid 19 patients found in last 48 hours | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोनाचा उद्रेक : कुंभमेळ्यात दोन दिवसांत तब्बल एक हजार भाविकांना संसर्ग

वृत्तसंस्था
बुधवार, 14 एप्रिल 2021

कुंभमेळ्यात बुधवारी तिसरे शाही स्नान परंपरागत पद्धतीने झाले. कोरोनाकाळातही कोणतीही खबरदारी न घेता लाखो भाविक स्नानासाठी गंगा नदीच्या किनारी जमले होते. 

हरिद्वार : जगातील सर्वांत मोठा धार्मिक उत्सव मानल्या जाणाऱ्या येथील कुंभमेळ्यात बुधवारी तिसरे शाही स्नान परंपरागत पद्धतीने झाले. कोरोना संकटातही खबरदारी न घेता लाखो भाविक स्नानासाठी गंगा नदीच्या किनारी एकत्र आले. या प्रचंड गर्दीमुळे येथील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, गेल्या ४८ तासांत एक हजारहून भाविक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. काही झाले तरी ३० एप्रिलपर्यंत कुंभमेळा सुरूच ठेवण्याचा निर्धार उत्तराखंड सरकारने व्यक्त केला आहे. 

तिसऱ्या शाही स्नानाची पर्वणी साधण्यासाठी साधू-महंत, विविध आखाड्यांसह लाखो भाविक आज गंगा नदीवर आले होते. यातील बहुतांश हे मास्कविना होते. प्रचंड गर्दीमुळे सुरक्षित अंतर कुठेही दिसत नव्हते. मोठे आखाडे शाही मिरवणूक काढत हर की पौडी घाटावर पोचले. सर्वप्रथम पंचायती आखाडा निरंजनी आणि त्याच्या सहयोगी आखाड्यांनी स्नान केले. त्यानंतर जुना आखाड्याचे स्नान झाले. आज सकाळी 8.30 ते सायंकाळी  5.30 पर्यंत सर्व १३ आखाड्यांसह 10 लाखांपेक्षा अधिक भाविकांना शाही स्नान केले. शाही स्नानाची पुढील पर्वणी २७ एप्रिलला आहे. 

कोरोनाची दुसरी लाट देशात आली आहे. देशभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीतही हरिद्वार येथील कुंभमेळ्यातील गर्दी कमी झालेली नाही. उत्तराखंडमध्ये काल कोरोनाचे एक हजार ९२५ रुग्ण आढळले होते. हरिद्वारमध्ये दोन दिवसांत 1 हजार जणांना संसर्ग झाल्याने नियोजित वेळेआधी कुंभमेळ्याची सांगता करण्यासाठी प्रशासन आखाड्यांशी चर्चा करीत आहे. 

हरिद्वार येथील कुंभमेळा येत्या ३० पर्यंत सुरूच राहणार असल्याचा खुलासा सरकारने केला आहे. हरिद्वार येथे गेल्या दोन दिवसांत 1 हजार कोरोना रुग्ण आढळूनही आज नियम न पाळता साधू-संत, महंतांसह भाविकांनी गंगा नदीत स्नान केले. उत्तराखंडमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने कुंभमेळ्याची सांगता नियोजित वेळेआधी करावी, अशी चर्चा उत्तराखंड सरकारकडून धार्मिक नेते व मोठ्या आखाड्यांशी करीत होते. मात्र अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सायंकाळी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

कुंभमेळ्याचे आयोजन जानेवारी महिन्यात केले जाते, परंतु कोरोनाची परिस्थती लक्षात घेऊन राज्य सरकारने यंदा एप्रिलमध्ये कुंभमेळ्याचे नियोजन केले. संसर्गामुळे कुंभमेळ्याचा कालावधी कमी करण्याचे निर्देश केंद्र सरकारच्या मार्गदर्शक नियमावलीत होते. त्याप्रमाणे कालावधी कमी करण्याबद्दल काही माहिती नाही, असे सांगत हरिद्वारचे जिल्हाधिकारी दीपक रावत यांनी यावर अधिक बोलणे टाळले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख