धक्कादायक : कुंभमेळ्यात आखाडा परिषदेच्या अध्यक्षांसह 30 साधू कोरोना पॉझिटिव्ह - in kumbh mela akhara president and 30 sadhus test positive for covid 19 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

धक्कादायक : कुंभमेळ्यात आखाडा परिषदेच्या अध्यक्षांसह 30 साधू कोरोना पॉझिटिव्ह

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

जगातील सर्वांत मोठा धार्मिक उत्सव असणाऱ्या कुंभमेळ्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. आता आखाडा परिषदेच्या अध्यक्षांनाच कोरोनाचा संसर्ग झाला आहे. 

हरिद्वार : जगातील सर्वांत मोठा धार्मिक उत्सव असणाऱ्या कुंभमेळ्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव दास यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. याचबरोबर अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला असून, त्यांच्यावर ऋषिकेश येथील एम्समध्ये उपचार सुरू आहेत. तसेच, इतर 30 साधूंना कोरोनाचा संसर्ग झाला असून, यामुळे खळबळ उडाली आहे.  

कुंभमेळ्यात आतापर्यंत 30 साधू कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. अनेक साधू कोरोना चाचणी करुन घेण्यास नकार देत असल्याने ही संख्या आणखी जास्त असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. वैद्यकीय पथके सर्व आखाड्यांमध्ये जाऊन साधूंची कोरोना चाचणी करीत आहेत. कुंभमेळ्यात पॉझिटिव्ह सापडणाऱ्या व्यक्ती हरिद्वारमधील असल्यास त्यांना गृह विलगीकरणात पाठवण्यात येत आहेत. त्या बाहेरील असल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. ज्यांना त्रास होत आहे अशा रुग्णांना ऋषिकेशमधील एम्समध्ये उपचारासाठी पाठवण्यात येत आहे. 

हेही वाचा : कोरोनाचा प्रकोप : सर्वांत मोठा नागा आखाडा पडला कुंभमेळ्यातून बाहेर 

कुंभमेळ्यात 10 ते 14 एप्रिल या कालावधीत 2 लाख 36 हजार 751 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यातील दोन हजार 200 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. आरटी-पीसीआर आणि रॅपिड अँटिजेन चाचण्या करण्यात येत असून, यात अनेक आखाड्यांच्या महंतांसह भाविक पॉझिटिव्ह सापडले आहेत, आणखी काही चाचण्यांचे अहवाल हाती आलेले नसून, हा आकडा वाढेल, अशी माहिती हरिद्वारचे मुख्य वैद्यकीय अधिकारी शंभूकुमार झा यांनी दिली. 

हरिद्वार, टिहरी आणि डेहराडून जिल्ह्यांत 670 हेक्टर जागेवर कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक आखाडे हे कोरोना चाचणी करुन घेण्यास नकार देत आहेत. यामुळे कोरोनाचा उद्रेक आणखी मोठा असण्याची शक्यता व्यक्त आहे. देशातील कोरोना रुग्णसंख्येत कुंभमेळ्यामुळे प्रचंड मोठी वाढ होईल, असा इशारा तज्ञ देत आहेत.

कुंभमेळ्यात आतापर्यंत दोन शाही स्नान झाले आहेत. यातील पहिले 12 एप्रिलला आणि दुसरे 14 एप्रिलला झाले. ही पर्वणी साधण्यासाठी साधू-महंत, विविध आखाड्यांसह सुमारे 48.51लाख भाविक गंगा नदीवर आले होते. यातील बहुतांश हे मास्कविना होते. प्रचंड गर्दीमुळे सुरक्षित अंतर कुठेही दिसत नव्हते. शाही स्नानाची पुढील पर्वणी २७ एप्रिलला आहे. 

कोरोनाची दुसरी लाट देशात आली आहे. देशभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीतही हरिद्वार येथील कुंभमेळ्यातील गर्दी कमी झालेली नाही. उत्तराखंडमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागले होते. हरिद्वारमध्ये पाच दिवसांत दोन हजारहून अधिक जणांना संसर्ग झाल्याने नियोजित वेळेआधी कुंभमेळ्याची सांगता करण्यासाठी प्रशासन आखाड्यांशी चर्चा करीत आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख