स्टॅन स्वामींच्या मृत्यूला NIA अन् तळोजा कारागृह जबाबदार? - Koregaon Bhima violence accused Stan Swamy passes away | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

स्टॅन स्वामींच्या मृत्यूला NIA अन् तळोजा कारागृह जबाबदार?

वृत्तसंस्था
सोमवार, 5 जुलै 2021

एल्गार परिषद व कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात अटक करण्यात आलेले स्टॅन स्वामी यांचे आज निधन झाले.

मुंबई : एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी स्टॅन स्वामी यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या आरोग्याबाबत निष्काळजीपणा करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. तळोजा कारागृह प्रशासनाची आणि NIA ची न्यायालयीन चौकशी करण्याची वकील मिहीर देसाई यांनी केली आहे. (Koregaon Bhima violence accused Stan Swamy passes away)

एल्गार परिषद व कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात अटक करण्यात आलेले स्टॅन स्वामी यांचे आज रुग्णालयात निधन झाले. सोमवारी त्यांच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात ही माहिती दिली. स्टॅन हे 84 वर्षांचे होते. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना कालपासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

हेही वाचा : संजय राऊत म्हणाले, भाजप अन् शिवसेनेचं नातं आमीर खान-किरण राव सारखं!

देसाई म्हणाले, स्टॅन स्वामी यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण 10 दिवस त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली नाही. खाजगी रुग्णालयात चाचणी केल्यानंतर ते कोरोनाबाधित असल्यांच आढळले. यामध्ये खूप निष्काळजीपणा करण्यात आला. त्यामुळे तळोजा कारागृह प्रशासन आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेची (NIA) ची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी देसाई यांनी केली आहे. 

दरम्यान, प्रकृती ठीक नसल्याने उच्च न्यायालयाने स्टॅन स्वामी यांना रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश 28 मे रोजी देण्यात आले होते. त्यानुसार त्यांना मुंबईतील होली फॅमिली रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मागील आठवड्यात स्वामी यांच्यामार्फत उच्च न्यायालयात नव्याने जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. 

मुंबईतील तळोजा कारागृहामध्ये स्वामी यांच्यासह इतर आरोपी दाखल होते. आरोग्यविषयक चांगल्या सुविधा नसल्याची तक्रार सातत्याने केली जात होती. कारागृह अधिकाऱ्यांकडून वैद्यकीय सुविधा, चाचण्या, स्वच्छता तसेच शारीरिक अंतर याबाबत योग्यप्रकारे काळजी घेत नसल्याची तक्रार त्यांनी केली होती. स्वामी यांनी मे महिन्यात व्हिडिओ काँन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयात याबाबत माहिती दिली होती. ही स्थिती अशीच राहिल्यास आपला लवकरच मृत्यू होईल, असंही स्वामी म्हणाले होते. 

स्वामी हे मागील पाच दशकांपासून झारखंडमधील आदिवासींसाठी काम करत आहेत. त्यांचा नक्षलवादी, विशेषत: सीपीआय (माओवादी) या बंदी घातलेल्या संघटनेशी संबंध असल्याचा आरोप राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) केला होता. मागील महिन्यात NIA ने स्वामी यांच्या जामीनाला विरोध केला होता. 

कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी 2018 रोजी मोठी हिंसाचार झाला होता. आदल्यादिवशी शनिवारवाडा येथे एल्गार परिषद पार पडली होती. यामध्ये प्रक्षोभक भाषणे करण्यात आल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला होता. त्यामुळंच हिंसाचार घडल्याचा दावाही यंत्रणांनी केला होता. स्वामी यांचा या परिषदेशी संबंध असल्याचा आरोप NIA ने केला होता.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख