मुंबईच्या महापौर म्हणतात, कुंभमेळ्यातील भाविकांचे विलगीकरण अन् संपूर्ण लॉकडाउन हवा! - kishori pednekar says total lockdown needed in current covid 19 situation | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

मुंबईच्या महापौर म्हणतात, कुंभमेळ्यातील भाविकांचे विलगीकरण अन् संपूर्ण लॉकडाउन हवा!

वृत्तसंस्था
शनिवार, 17 एप्रिल 2021

जगातील सर्वांत मोठा धार्मिक उत्सव असणाऱ्या कुंभमेळ्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. कुंभमेळ्यातून परतणाऱ्या भाविकांचे विलगीकरण करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. 

हरिद्वार : जगातील सर्वांत मोठा धार्मिक उत्सव असणाऱ्या कुंभमेळ्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. कुंभमेळ्यातून विविध राज्यांत परतणाऱ्या भाविकांमुळे कोरोनाचा प्रसार आणखी वाढेल, अशी भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील भाजप सरकारने कुंभमेळ्यातून परतणाऱ्या भाविकांसाठी कोरोना चाचणीची सक्ती केली आहे. आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही हाच मुद्दा उपस्थित केला असून, मुंबईत संपूर्ण लॉकडाउनची मागणीही केली आहे.   

कुंभमेळ्यात कोरोनाचा प्रादुर्भावा वाढू लागल्याने आखाडेही बाहेर पडू लागले आहेत. निरंजनी आखाडा हा कुंभमेळ्यातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा आणि नागा साधूंचा सर्वांत मोठा आखाडा आहे. या आखाड्यातील अनेक साधू पॉझिटिव्ह आल्याने कुंभमेळ्यातून 17 एप्रिलला बाहेर पडण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव दास यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, अनेक आखाड्यांतील साधूंना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सुमारे 50 साधूंना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे समजते. 

या पार्श्वभूमीवर बोलताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, कुंभमेळ्यातून परतणारे भाविक त्यांच्या राज्यात परत जाऊन कोरोनाचा प्रसाद वाटणार आहेत. प्रत्येक राज्याने यासाठी खबरदारी घ्यायला हवी. यामुळे कुंभमेळ्यातून मुंबईत येणाऱ्या भाविकांना विलगीकरणात ठेवण्याच्या प्रस्तावावर आमचा विचार सुरू आहे. मात्र, या विलगीकरणाचा खर्च या भाविकांनाच करावा लागेल. इतर राज्यांनीही आमचे अनुकरण करायला हवे. 

मुंबईत पूर्ण लॉकडाउन केला जावा असे सांगून पेडणेकर म्हणाल्या की, मुंबईतील 95 टक्के नागरिक कोरोनाविषयक नियमांचे पालन करीत आहेत. उरलेले 5 टक्के लोक मात्र, नियम न पाळता इतरांसाठी समस्या निर्माण करीत आहेत. सध्याची कोरोनाची स्थिती पाहता पूर्ण लॉकडाउन करण्याची आवश्यकता आहे. 

या पार्श्वभूमीवर भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी आखाड्यांशी चर्चा केली आहे. या चर्चेला अनेक आखाड्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. नियोजित वेळापत्रकानुसार कुंभमेळा 30 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तो दोन दिवसांत आटोपता घेतला जाण्याची शक्यता आहे. मात्र, आखाड्यांमधील काही जण याला विरोध करीत आहेत. परंतु, कोरोना संसर्गाचा प्रकोप पाहता हे आखाडे या मागणीला होकार दर्शवतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

कुंभमेळ्यात आतापर्यंत दोन शाही स्नान झाले आहेत. यातील पहिले 12 एप्रिलला आणि दुसरे 14 एप्रिलला झाले. ही पर्वणी साधण्यासाठी साधू-महंत, विविध आखाड्यांसह सुमारे 48.51लाख भाविक गंगा नदीवर आले होते. यातील बहुतांश हे मास्कविना होते. प्रचंड गर्दीमुळे सुरक्षित अंतर कुठेही दिसत नव्हते. शाही स्नानाची पुढील पर्वणी २७ एप्रिलला आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख