मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचे घर आणि कार्यालयांवर सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) छापे टाकल्यानंतर मोठा गदारोळ सुरू झाला आहे. सरनाईक यांना चौकशीसाठी आज हजर राहण्यासाठी ईडीने समन्स बजावले होते. मात्र, सरनाईक हे क्वारंटाइन झाले असून, त्यांनी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी एक आठवड्याचा कालावधी मागितला आहे. यावरुन भाजप नेते किरीट सोमय्या यांनी थेट आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.
I wrote to Maharashtra Health Minister Shri Rajesh Tope & inquired that " as precaution & protection Thackeray Sarkar must have quarantined Shri Sanjay Raut & others, whom Shri Pratap Sarnaik met yesterday. @BJP4Maharashtra pic.twitter.com/eDfJrgUEPE
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 25, 2020
ईडीने आमदार सरनाईक आणि त्यांचा पुत्र विहंग यांना आज चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. मात्र, दोघेही चौकशीसाठी हजर झाले नाहीत, अशी माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली. ईडीने काल एकूण 10 ठिकाणी छापे टाकले आहेत. त्यात प्रताप सरनाईक यांचे घर, मुलांचे घर, कार्यालये ही ठिकाणे होती. परदेशात पैसे पाठवल्याप्रकरणी हे छापे टाकण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.
प्रताप सरनाईक यांच्या मेहुण्याने ईडीला या संदर्भात पत्र दिले आहे. यात चौकशीसाठी हजर राहण्यास एक आठवड्याला कालावधी त्यांनी मागितला आहे. सरनाईक हे बाहेरुन मुंबईत आल्याने त्यांना नियमानुसार क्वारंटाइन करण्यात आले आहे. याचवेळी प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश यांनाही क्वारंटाइन करण्यात आले आहे. दुसरे पुत्र विहंग यांची पत्नी हायपरटेन्शनमुळे रुग्णालयात दाखल असून, ते पत्नीसमवेत रुग्णालयात थांबले आहेत.
सरनाईक यांचे मेहुणे आज हे पत्र घेऊन ईडीच्या कार्यालयात आले होते. प्रताप सरनाईक आणि विहंग यांना आज सकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. दोघांनाही चौकशीसाठी हजर राहण्यास एक आठवड्यांचा कालावधी द्यावा, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.
सोमय्या यांनी या प्रकरणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनाही पत्र लिहिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, प्रताप सरनाईक हे काल बाहेरुन मुंबईत आले. महापालिका आरोग्य विभागाचा फोन आल्यानंतर त्यांनी स्वत:ला क्वारंटाइन करुन घेतले आहे. सरनाईक यांनी काल अनेक जणांची भेट घेतली होती. त्यात खासदार संजय राऊत, आमदार सुनील राऊत यांच्यासह अनेक पत्रकारही होते. या सगळ्यांना ठाकरे सरकारने क्वारंटाइन कररण्याचे निर्देश दिले असतीलच किंवा केव्हा देणार?
आमदार सरनाईक यांचे मुंबई तसेच ठाणे येथील कार्यालये आणि घरावर ईडीने काल छापा टाकत कारवाई केली होती. दहा ठिकाणी छापा टाकून कारवाई केल्यानंतर सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश आणि विहंग यांच्या घरीदेखील ईडीचे पथक पोचले होते. त्यानंतर ईडीने विहंग सरनाईक यांची चौकशी सुरू केली होती. ईडीने सरनाईक यांचे पुत्र विहंग यांची काल पाच तास कसून चौकशी केली आहे. चौकशी झाल्यानंतर ते ठाण्याला रवाना झाले होते.
Edited by Sanjay Jadhav

