दे धक्का! महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा करणार राष्ट्रवादीत प्रवेश - kerala mahila congress former chief lathika subhash will join ncp | Politics Marathi News - Sarkarnama

दे धक्का! महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा करणार राष्ट्रवादीत प्रवेश

वृत्तसंस्था
सोमवार, 24 मे 2021

राष्ट्रवादी काँग्रेसकडून सहकारी पक्ष असलेल्या काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार आहे. 

तिरूअनंतपुरम : केरळमधील (Kerala)  विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून (Congress) बाहेर पडलेले पी.सी.चाको (P.C.Chacko) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला होता. आता राज्य महिला काँग्रेसच्या (Mahila Congress) माजी अध्यक्षा लतिका सुभाष (Lathika Subhash) या राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. याबाबत त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पी.सी.चाको यांच्याशी चर्चा केली असून, याची लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.  

केरळमध्ये विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसला धक्का देत माजी खासदार पी. सी. चाको बाहेर पडले होते. ते मागील पाच दशकांपासून केरळ काँग्रेसमध्ये सक्रीय होते. काँग्रेसमध्ये गटबाजी होत असल्याचा आरोप करत त्यांनी मार्च महिन्यात पक्षाला रामराम ठोकला होता. मात्र, कोणत्या पक्षात जाणार याबाबत त्यांनी त्यावेळी स्पष्ट केले नव्हते. मात्र, नंतर त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. आता ते राष्ट्रवादीचे केरळ प्रदेशाध्यक्ष आहेत.  

आता कायम चर्चेत राहणाऱ्या काँग्रेस नेत्या लतिका सुभाष या राष्ट्रवादीत येणार असल्याने पक्षाची ताकद केरळमध्ये वाढणार आहे. काँग्रेसने विधानसभेचे तिकिट न दिल्याने त्यांनी जाहीरपणे पक्षाच्या मुख्यालयसमोर मुंडण करुन निषेध केला होता. लतिका सुभाष यांनी एट्टामनूर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. यात त्यांना 7 हजार 600 मते मिळाली होती. परंतु, त्यांनी मते खाल्ल्याने काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. 

हेही वाचा : जिल्हाधिकाऱ्यांनतर आता उपजिल्हाधिकाऱ्यांनी गाजवला पराक्रम 

लतिका सुभाष यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम लवकरच होण्याची शक्यता आहे. याबद्दल बोलताना लतिका सुभाष म्हणाल्या की, राष्ट्रवादी हा राष्ट्रीय पक्ष असून तो काँग्रेसच्या परंपरेशी जोडला गेलेला आहे. मी पक्ष प्रवेशाबाबत चाको यांच्याशी चर्चा केली आहे. लवकरच मी माझा निर्णय जाहीर करेन. 

चाको हे चारवेळा खासदार राहिले आहेत. केरळमध्ये विद्यार्थी काँगेसमधून त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. १९८० मध्ये ते पहिल्यांदा केवळ विधानसभेत निवडून गेले होते. त्यावेळी त्यांना उद्योग खाते मिळाले होते. तर १९९१ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक जिंकली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची चाको यांनी मार्च महिन्यात भेट घेतली होती. त्यानंतर एकत्रित पत्रकार परिषद घेऊन चाको यांच्या पक्ष प्रवेशाबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली होती. चाको यांनी राजीनामा देताना थेट काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहिले होते. केरळ काँग्रेसमधील सध्याच्या स्थितीत काम करणे कठीण आहे. पक्षामध्ये दोन गट असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले होते. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख