धनंजय मुंडेंच्या दुसऱ्या पत्नी करुणा म्हणतात, मी राजकारणातही येणार! - karuna munde says she is social workers and may be join politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

धनंजय मुंडेंच्या दुसऱ्या पत्नी करुणा म्हणतात, मी राजकारणातही येणार!

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 17 मार्च 2021

धनंजय मुंडे यांच्या दुसरी पत्नी करुणा यांनी सक्रिय समाजकारण सुरू केले असून, राजकारण प्रवेशाचे  संकेत दिले आहेत. 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा मुंडे या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. त्यांनी सक्रिय समाजकारण सुरू केले असून, राजकारणात उतरण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी स्वच्छतागृह आणि स्वच्छताप्रश्नी मुंबई महापालिकेत धाव घेतली. मी समाजसेविका असून, राजकारणातही येईन, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले आहे. 

करुणा यांनी महापालिकेत जाऊन आज 'पी' उत्तर विभागातील स्वच्छतागृह आणि स्वच्छतेच्या प्रश्नी महापौरांकडे निवेदन दिले. या वेळी बोलताना त्या म्हणाल्या की, पी उत्तर विभागात 18 वॉर्ड असून, एकच स्वच्छता अधिकारी आहे. कोरोना काळात स्वच्छतेवर अधिक लक्ष द्यायला हवे. आपल्या नरेंद्र मोदींचा नाराच आहे की, स्वच्छ भारत अभियान. परंतु, असे काही तेथे दिसत नाही. आम्ही जीवन ज्योत सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून निवेदन दिले आहे. 

करुणा या जीवन ज्योत सामाजिक सेवा संस्थेच्या महाराष्ट्र महिला अध्यक्षा आहेत. त्या म्हणाल्या की, या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य म्हणजे आम्ही कोणतेही सामाजिक काम करतो. सफाई अभियानावर काम करीत आहोत. आमची संस्था खूप काम करीत आहे. सार्वजनिक स्वच्छतागृह उद्घाटनाविना पडून आहे. ते सुरू करावे, अशी आमची मागणी आहे. राजकारणात येण्याआधी मला चांगली समाजसेविका व्हायचे आहे. त्यानंतर मी राजकारणाचा विचार करेन. मला आमदारकीची निवडणूक लढवायला आवडेल. 

मी २५ वर्षे कधीच घराबाहेर पडले नव्हते. गेल्या २ महिन्यांपासून मी घराबाहेर पडून बोलायला सुरुवात केली आहे. मला कळतेय तेव्हापासून मी घरातच होते. मी माध्यमांसमोर अशी येईन असे मला वाटलेही नव्हते. पूजा चव्हाणसह अन्याय झालेल्या इतर मुलींना मी न्याय मिळवून देणार आहे. महिलांची स्थिती वाईट आहे. माझ्यासोबत काय झाले ते पाहता मीसुद्धा आत्महत्या कऱणार होते. पण मी विचार केला की, इतरांसाठी लढेन. मी 50 जणांसाठी लढून 5 जणांना न्याय मिळाला तर मी सौभाग्यशाली समजेन. मी लढण्यासाठी बाहेर पडले असून, माझ्यासह इतरांना न्याय मिळवून देणार आहे. असेही त्यांनी सांगितले. 

दरम्यान, करुणा मुंडे यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचीही भेट घेतली. सोशल मीडियावरील खलिफा डॉट कॉमसारख्या अॅप्लीकेशनविरोधात फेसबुक आणि इतर समाजमाध्यमांवर अश्लील व्हिडीओ असतात त्याविरोधात कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख