मुंबई : टिकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर राज्यात मोठा गदारोळ उडाला आहे. विरोधी पक्षांनी या प्रकरणी शिवसेना नेते व वनमंत्री संजय राठोड यांना लक्ष्य केले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नीने या प्रकरणात उडी घेतली आहे. पूजा चव्हाणला न्याय मिळावा, यासाठी त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
करुणा धनंजय मुंडे यांनी पूजा चव्हाणला न्याय मिळावा, अशी मागणी सोशल मीडियावर केली आहे. यात त्यांनी जीवन ज्योत सामाजिक सेवा संस्थेचा उल्लेख केला. त्यांनी या संस्थेच्या महाराष्ट्र महिला अध्यक्षा म्हणून स्वत:चा उल्लेख केला आहे. पूजाला त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजलीही वाहिली आहे.
करुणा यांनी म्हटले आहे की, जे दिशाबरोबर झाले आहे, तेच पूजाबरोबर होणार असेल तर तो शक्ती कायदा काय चाटायचा आम्ही. आम्ही न्याय मागतो भीक नाही. पूजा चव्हाण यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे. पूजा चव्हाण यांना न्याय भेटलाच पाहिजे.
दरम्यान, पूजाने आत्महत्या केली नाही, असा दावा तिच्या नातेवाईक शांताबाई राठोड यांनी केला होता. त्या म्हणाल्या होत्या की, पूजाने आत्महत्या केली नाही. पूजाला यवतमाळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तिथेच तिला मारले असावे आणि पुण्यातील बिल्डींगवरून फेकले असावे. पूजा ही आत्महत्या करणारी मुलगी नव्हती. तिने आत्महत्या केली नाही तर तिचा घातच झाला आहे.
या प्रकरणात पोलीस योग्यप्रकारे तपास करत नसल्याचा आरोपही विरोधकांनी केला आहे. या प्रकरणावरून विरोधकांकडून पुणे पोलिसांना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे राज्याच्या पोलीस महासंचालकांचेही या प्रकरणाकडे बारकाईने लक्ष आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे पोलिसांकडून यवतमाळमध्येही याप्रकरणाचे धागेदोरे शोधले जात आहेत. या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
यावर उपमुख्यमंत्री अजित पवार नुकतेच म्हणाले होते की, पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी कुणालाही पाठीशी घालणार नाही. या प्रकरणाची चैाकशी पोलीस करीत आहेत. त्यांना चौकशीला वेळ दिला पाहिजे. या तपासात राजकीय हस्तक्षेप नाही.

