कर्नाटकात भाजपला मोठा धक्का अन् काँग्रेसचा दणदणीत विजय - karnataka urban bodies election bjp lost and congress register big win | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

कर्नाटकात भाजपला मोठा धक्का अन् काँग्रेसचा दणदणीत विजय

वृत्तसंस्था
शनिवार, 1 मे 2021

कर्नाटकातील महापालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजपला मोठा झटका बसला आहे. 

बंगळूर : कर्नाटकातील 10 महापालिकांच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसने दहापैकी 7 महापालिकांवर विजय मिळवला आहे. याचवेळी भाजपला केवळ 1 महापालिका जिंकता आली असून, धर्मनिरपेक्ष जनता दलाला (जेडीएस) दोन महापालिकांवर विजय मिळवता आला आहे. सत्ताधारी भाजपसह मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांना हा मोठा झटका बसला आहे. 

राज्यात 10 महापालिकांच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये काँग्रेसने भाजपसमोर तगडे आव्हान उभे केले होते. मुख्यमंत्री येडियुरप्पांना त्यांच्याच जिल्ह्यात फटका बसला आहे. तीर्थहळ्ली महापालिकेत भाजपची 25 वर्षे असलेली सत्ता अखेर गेली आहे. याचवेळी भद्रावती महापालिकेत भगवा फडकावण्याचे भाजपचे स्वप्न भंगले आहे. मुख्यमंत्र्यांच्या शिवमोगा जिल्ह्यातील दोन्ही महापालिका काँग्रेसकडे गेल्या आहेत. विशेष म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते व ग्रामविकास मंत्री के.एस.ईश्वरप्पा हे याच जिल्ह्यातील आहेत. 

या निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, काँग्रेस 10 पैकी 7 महापालिका जिंकल्या आहेत. कर्नाटकातील जनतेने काँग्रेसवर विश्वास दाखवला असून, भाजप सरकारला चुकीच्या कारभाराबद्दल शिक्षा दिली आहे. याबद्दल मी राज्यातील जनतेचे आभार मानतो. काँग्रेस या निवडणुकीत एकूण 119 जागा जिंकल्या आहेत. याचवेळी भाजपला 56 आणि जेडीएसला 67 जागा मिळाल्या आहेत. 

राज्यातील कोरोना संकटामुळे कोणताही जल्लोष न करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. याबद्दल बोलताना शिवकुमार म्हणाले की, काँग्रेसचे कार्यकर्ते विजयाचा जल्लोष साजरा करणार नाहीत. हा विजय साजरा करण्याचा काळ नाही तर जनतेला कठीण संकटात मदत करण्याचा काळ आहे. राज्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष न करता राष्ट्रीय आरोग्य आणीबाणीमध्ये जनलेला मदत करावी. 

काँग्रेस नेते सिद्धरामय्या म्हणाले की, सत्ताधारी भाजपवरील जनतेचा विश्वास उडाल्याचे या निवडणुकांच्या निकालातून सिद्ध झाले आहे. कोरोना संकटाच्या काळात भाजप सरकार जनतेच्या जिवाशी खेळत आहे. याचमुळे जनतेने भाजपला चांगला धडा शिकवला आहे. आता येडियुरप्पांनी त्यांचे सरकार विसर्जित करायले हवे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख