आरोग्यमंत्री हतबल झाले अन् म्हणाले, तुमच्या पाया पडतो पण मोबाईल तरी चालू करा! - karnataka health minister appeals to missing covid positive patients | Politics Marathi News - Sarkarnama

आरोग्यमंत्री हतबल झाले अन् म्हणाले, तुमच्या पाया पडतो पण मोबाईल तरी चालू करा!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 एप्रिल 2021

देशातील कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कर्नाटकातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असताना आता कोरोना रुग्ण गायब होऊ लागल्याने सरकारची डोकेदुखी वाढली आहे.   

बंगळूर : कर्नाटकात कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. असे असताना बंगळूरमध्ये तब्बल 2 ते 3 हजार कोरोना पॉझिटिव्ह आलेले नागरिक गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे नागरिक मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार करण्याची भीती असल्याने राज्य सरकारचे धाबे दणाणले आहेत. आधीच कोरोना संकटामुळे धास्तावलेल्या आरोग्यमंत्र्यांनी या नागरिकांना आता हात जोडून विनंती केली आहे. 

या विषयी बोलताना आरोग्यमंत्री आर. अशोक म्हणाले की, तुमच्या अशा वर्तनामुळे कोरोनाचा प्रसार आणखी वाढणार आहे. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की तुम्ही असे प्रकार करु नका. इतर काही तुम्ही करु नका, केवळ तुम्ही तुमचा मोबाईल चालू करा. पोलीस तुम्हाला शोधून काढून योग्य ठिकाणी पोचवतील आणि आम्ही तुमची काळजी घेऊ. अचानक तुमची तब्येत बिघडल्यास तुम्हाला रुग्णालय शोधताना अडचणी येतील. 

हेही वाचा : सरकारचे धाबे दणाणले : तब्बल 3 हजार कोरोना रुग्ण गायब 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगळूरमधून सुमारे 2 ते 3 हजार कोरोना रुग्ण गायब झाले आहेत. कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर हे रुग्ण मोबाईल बंद करुन आणि घराला कुलूप लावून गायब झाले आहेत. त्यांच्यामुळे इतर नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच, या गायब झालेल्या रुग्णांना काही त्रास झाला तर ऐनवेळी त्यांना रुग्णालय शोधण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे. यामुळे सरकारी यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत. या गायब रुग्णांचा शोध पोलीस घेत आहेत. 

देशात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या पहिल्या दहा राज्यांमध्ये कर्नाटकचा समावेश आहे. देशातील दहा राज्यांमध्ये एकूण रुग्णांपैकी 72.20 टक्के रुग्ण आहेत. मागील 24 तासांत कर्नाटकात 39 हजार 47 कोरोना रुग्ण सापडले आहेत. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 3 लाख 28 हजार 903 आहे. मागील  24 तासांत राज्यात 270 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

देशात दर तासाला कोरोनामुळे 145 जणांचा मृत्यू 
देशात आता दरतासाला सुमारे 145 जणांचा कोरोनामुळे बळी जात आहे. देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 1 कोटी 87 लाख 62 हजार 976 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 8 हजार 330 झाली आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत कोरोनाचे नवीन 3 लाख 86 हजार 452 रुग्ण सापडले असून, 3 हजार 498 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

मागील 24 तासांत देशात 3 हजार 498 मृत्यू झाले आहेत. यात महाराष्ट्र 771, दिल्ली 395, उत्तर प्रदेश 295, कर्नाटक 270, छत्तीसगड 251, गुजरात 180, राजस्थान 158, झारखंड 145, पंजाब 137 आणि तमिळनाडूतील 107 मृत्यूंचा समावेश आहे.  

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख