कर्नाटकनंतर आता गुजरात अन् मध्य प्रदेशने केली महाराष्ट्राची नाकाबंदी! - karnataka gujarat and madhya pradesh restricts travel from maharashtra | Politics Marathi News - Sarkarnama

कर्नाटकनंतर आता गुजरात अन् मध्य प्रदेशने केली महाराष्ट्राची नाकाबंदी!

वृत्तसंस्था
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021

कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात वाढू लागला असून, शेजारील कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांनी खबरदारीची पावले उचलली आहेत.

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून कर्नाटक सरकारने आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्याचे प्रमाणपत्र असल्याशिवाय महाराष्ट्रातील नागरिकांना राज्यात प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला होता. आता गुजरात आणि मध्य प्रदेशने महाराष्ट्रातीन नागरिकांना प्रवेश नाकारण्यास सुरवात केली आहे. एकाचवेळी कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेशने नाकेबंदी केल्याने महाराष्ट्राची कोंडी झाल्याचे चित्र आहे. 

महाराष्ट्र, केरळ, मध्य प्रदेश, पंजाब आणि छत्तीसगडमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत. यामुळे सर्वच राज्यांनी खबरदारी घेण्यास सुरवात केली आहे. यावर कडी करत कर्नाटकचे आरटी-पीसीआर चाचणीने निगेटिव्ह प्रमाणपत्र असल्याशिवाय महाराष्ट्रातील नागरिकांना प्रवेशबंदी केली आहे. याचीच री ओढत गुजरात आणि मध्य प्रदेशने महाराष्ट्रातील नागरिकांना प्रवेशावर निर्बंध घालण्यास सुरवात केली आहे.

गुजरात आणि मध्य प्रदेशने महाराष्ट्रातून येणाऱ्या नागरिकांची सीमांवर तपासणी करण्यास सुरवात केली आहे. यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. तसेच, सीमांवर फार मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र आहे.  दरम्यान, कर्नाटक, गुजरात आणि महाराष्ट्र या तिन्ही राज्यांत भाजपची सत्ता आहे. महाराष्ट्र सरकारची कोंडी करण्यासाठीच भाजपशासित राज्यांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा सुरू आहे. 

कर्नाटकचे आरोग्यमंत्री  डॉ.के. सुधाकर यांनी याविषयी माहिती दिली होती. डॉ. सुधाकर म्हणाले होते की, महाराष्ट्र आणि केरळशी कर्नाटकच्या सीमा जोडलेल्या आहेत. महाराष्ट्रात रोज सरासरी 5 ते 6 हजार कोरोना रुग्ण सापडत आहेत. याचवेळी केरळमध्ये रोज सरासरी 4 ते 5 हजार कोरोना रुग्ण सापडत आहेत. यामुळे या दोन्ही राज्यांतील नागरिकांना कर्नाटकमध्ये प्रवेश करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्याचे प्रमाणपत्र असल्याशिवाय महाराष्ट्रासह केरळमधील नागरिकांना कर्नाटकमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. 

दरम्यान, कर्नाटकचे प्रवेशद्वार असणाऱ्या कोगनोळी टोलनाक्‍यावर महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व प्रवाशांची तपासणी करूनच कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे.कोगनोळी टोलनाक्‍यावर तहसीलदार कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत विभागाचे कर्मचारी तैनात केले आहेत. त्यांच्याकडून महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांसह प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने आशा कार्यकर्त्या, आरोग्य अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. 

अचानक आरोग्य विभागाने ही तपासणी सुरू करण्यात आली आहे. कोगनोळी टोलनाक्‍यावर महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणारी चारचाकी वाहने, इतर वाहने आणि त्यातील प्रवाशांची तपासणी करून कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांमध्ये ताप, खोकला, सर्दी अशी लक्षणे असल्यास त्यांना परत पाठवण्यात येत आहे. 

Edited Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख