शहा, नड्डांची भेट झाली अन् येडियुरप्पा म्हणाले, आता लवकरच गुड न्यूज!

कर्नाटकातील सत्ताधारी भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी आज अमित शहा आणि जे.पी. नड्डा यांची भेट घेतली.
karnataka cm yediyurappa meet amit shah and j p nadda in delhi
karnataka cm yediyurappa meet amit shah and j p nadda in delhi

बंगळूर : कर्नाटकमध्ये सत्ताधारी भाजपमधील मतभेद वारंवार समोर येऊ लागले आहेत. मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांना पक्षांतर्गत विरोध दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. यामागे मंत्रिमंडळ विस्ताराचे कारण असल्याचीही चर्चा सुरू आहे. अखेर मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी आज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. 

कर्नाटकातील मंत्रिमंडळ विस्ताराचे भिजत घोंगडे मागील वर्षभरापासून कायम आहे. यामुळे अनेक नेते नाराज आहेत. मंत्रिपदासाठी इच्छुक असलेले नेते अस्वस्थ झाले असून, ते मुख्यमंत्री येडियुरप्पा आणि सरकारला लक्ष्य करीत आहेत. सध्या मंत्रिमंडळात 27 मंत्री असून, एकूण क्षमता 34 पर्यंत वाढवता येऊ शकते. 

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी आज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. या बैठकीला कर्नाटकचे प्रभारी अर्जुनसिंह हे सुद्धा उपस्थित होते. या बैठकीनंतर बोलताना येडियुरप्पा म्हणाले की, आमची मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सविस्तर चर्चा झाली आहे. आमची चर्चा ही सकारात्मक आणि फलदायी ठरली आहे. लवकरच अंतिम नावांवर शिक्कामोर्तब होईल. या चर्चेबद्दल मी समाधानी आहे. मला आता केवळ सूचनांची प्रतिक्षा आहे. तुम्हाला लवकरच गुड न्यूज मिळेल. 

मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल पक्ष नेतृत्वासोबत ही शेवटचीच बैठक का, असे विचारल्यावर येडियुरप्पा म्हणाले की, अगदी 101 टक्के ही शेवटची बैठक आहे. ते लवकरात लवकर नावे निश्चित करतील. मी काही नावे सुचवली आहेत. त्यावर नेतृत्व सकारात्मक विचार करेल, अशी आशा मला आहे. 

मंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या नेत्यांमध्ये आमदार उमेश कत्ती, मुनिरत्न, बसनगौडा पाटील-यतनाळ, एम.पी.रेणुकाचार्य, अरविंद लिंबावली आणि एस.आर. विश्वनाथ यांचा समावेश आहे. याचबरोबर विधान परिषदेचे आमदार असलेले सी.पी.योगेश्वर, एम.टी.बी.नागराज आणि आर.शंकर यांचीही नावे आघाडीवर आहेत. 

राज्यात भाजपला येडियुरप्पा यांच्याशिवाय पर्याय नसल्याचे चित्र आहे. येडियुरप्पा यांना दुखावणे भाजप नेतृत्वाला परवडण्यासारखे नाही. यातच त्यांचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत तेच मुख्यमंत्री राहतील, अशी हमीही नुकतीच पक्ष नेतृत्वाने दिली आहे.

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com