कर्नाटकात येडियुरप्पांची खुर्ची बळकट; प्रदेशाध्यक्ष बदलही टळला - karnataka cm b s yediyurappa will not be replaced says bjp | Politics Marathi News - Sarkarnama

कर्नाटकात येडियुरप्पांची खुर्ची बळकट; प्रदेशाध्यक्ष बदलही टळला

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 जून 2021

कर्नाटकात मागील काही दिवसांपासून नेतृत्व बदलाची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांना बदलले जाईल, अशी अटकळ बांधली जात होती. 

बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) मागील काही दिवसांपासून नेतृत्व बदलाची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांना बदलले जाईल, अशी अटकळ बांधली जात होती. भाजपचे (BJP) राष्ट्रीय सरचिटणीस व कर्नाटक प्रदेश भाजपचे प्रभारी अरुण सिंह यांनी मुख्यमंत्री बदलाची चर्चा फेटाळून लावली आहे. तसेच, भाजपचे प्रदेशाध्यक्ष नळीनकुमार कटील यांनाही पदावरून हटविण्यात येणार नसून, या केवळ अफवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

कर्नाटकात मागील काही काळापासून भाजपच्या आमदारांनी उघडपणे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. याचबरोबर काही आमदारांनी तर थेटपणे मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले आहे. राज्यातील भाजप नेत्यांमध्ये मुख्यमंत्र्यांबद्दल मोठी नाराजी आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी त्यांना पदावरुन हटवले जाईल, अशी चर्चा सुरू होती. 

या पार्श्वभूमीवर बोलताना पक्षाचे प्रभारी अरुण सिंह म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष हे दोघेही अतिशय चांगल्या पद्धतीने काम करीत आहेत. त्यांना पदावरून हटवण्याचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. दोन्ही नेते त्यांच्या पदावर कायम राहणार आहेत. त्यांना पदावरून हलवण्यात येणार असल्याचे वृत्त ही केवळ अफवा. त्यांना कोणताही आधार नाही. 

हेही वाचा : तन्मय फडणवीसने लस कशी घेतली? अखेर उलगडा झाला 

मुख्यमंत्री येडियुरप्पा अतिशय चांगले काम करत आहेत. त्यांनी व त्यांच्या मंत्रिमंडळाने कोरोना संकट कार्यक्षमपणे हाताळले.  असे असताना मुख्यमंत्री बदलण्याची काय गरज आहे. पक्षीय कामांबाबत जाहीरपणे बोलणाऱ्या नेत्यांना पक्ष सहन करणार नाही. अशी वक्तव्ये ते का करतात याचा त्यांना जाब विचारण्यात येईल. स्वाक्षरी मोहीम राबवणाऱ्या नेत्यांची कृतीही पक्ष सहन करणार नाही. मी पुढील आठवड्यात बंगळूरला भेट देणार आहे. त्यावेळी सर्व नेत्यांना भेटून त्यांच्या तक्रारी ऐकून घेणार आहे, असे सिंह म्हणाले. 

दरम्यान, येडियुरप्पा यांनी पक्षाच्या नेतृत्वाचा विश्वास आहे, तोपर्यंत पदावर राहीन. त्यांनी सांगताच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देईन, असे विधान केले होते. याबाबत पत्रकारांनी प्रश्न केला असता सिंह म्हणाले, मुख्यमंत्र्यांचे विधान हे चुकीचे नाही. त्यांच्या वक्तव्यामध्ये मला तर काहीच चुकीचे आढळत नाही. त्यांनी पक्षश्रेष्ठींवर विश्वास व्यक्त केला आहे. पक्षाचे सर्व नेते व पक्षश्रेष्ठींवर विश्वास असल्याचा त्यांनी मुख्यमंत्र्यांचा दावा केला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख