येडियुरप्पांचा 24 तासांत यू-टर्न...आधी पक्षाला आव्हान अन् नंतर तलवार म्यान!

मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांना पदावरुन हटवण्यासाठी पक्ष नेतृत्वाने हालचाली सुरू केल्या आहेत.
karnataka chief minister yediyurappa tweets about party discipline
karnataka chief minister yediyurappa tweets about party discipline

बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) भाजपमधील (BJP) अंतर्गत मतभेद दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांना पदावरुन हटवण्यासाठी पक्ष नेतृत्वाने हालचाली सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर येडियुरप्पांनी लिंगायत मठांच्या प्रमुखांना आपल्या पाठीशी उभे करीत पक्ष नेतृत्वाला आव्हान दिले होते. आता येडियुरप्पांनी 24 तासांतच यू-टर्न घेत पक्षशिस्तीचे गोडवे गात तलवार म्यान केली आहे.  

येडियुरप्पांनी ट्विटरवर म्हटले आहे की, मी भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता बनण्याची संधी मला मिळाली हे माझे भाग्य आहे. पक्षाची सेवा करणे हा माझा सन्मान असून, उच्च मूल्ये आणि चांगले वर्तन मी कायम ठेवले. प्रत्येकाने पक्षाच्या नीतीमूल्यांप्रमाणे वागावे. कुणीही निषेध अथवा बेशिस्तीचे वर्तन करु नये. बेशिस्तिीने तुम्ही पक्षाचा अनादर करत आहात. 

येडियुरप्पा हे 78 वर्षांचे आहेत. त्यांना मुख्यमंत्री पदावरुन हटवण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाकडून पावले उचलण्यास सुरवात झाली आहे. येडियुरप्पा यांना यासाठी मागील आठवड्यात दिल्लीलाही बोलावून घेण्यात आले होते. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही त्यांनी चर्चा केली होती. राज्यात परतल्यानंतर येडियुरप्पांनी लिंगायत कार्ड खेळले. राज्यातील लिंगायत समाजाचे नेतृत्व म्हणून येडियुरप्पांना पाहिले जाते. पक्षीय भिंती ओलांडूनही अनेक पक्षांतील नेते लिंगायत नेते म्हणून येडियुरप्पांना मान्यता देतात. 

येडियुरप्पांनी राज्यातील लिंगायत मठांच्या प्रमुखांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर सर्व मठाधिपतींनी येडियुरप्पा यांना मुख्यमंत्री पदावरुन हटवू नये, असा इशारा भाजप नेतृत्वाला दिला. स्वामी श्रीगेरे सनेहळ्ळी म्हणाले की, प्रत्येक राज्य सरकारने स्वतंत्रपणे काम करणे अपेक्षित आहे. परंतु, केंद्र सरकार हस्तक्षेप करु लागल्यास मुख्यमंत्री चांगले काम करु शकत नाहीत. वारंवार मुख्यमंत्री बदलल्यास अधिकाऱ्यांना काम करणे अवघड बनते. केंद्र सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा आणि मुख्यमंत्र्यांना त्यांचे काम करु द्यावे. 

येडियुरप्पांनी बोलावलेल्या बैठकीला वीरशैव-लिंगायत समाजाचे मठाधिपती उपस्थित होते. याचबरोबर समाजातील राजकीय नेतेही उपस्थित होते. राज्यात या समाजाची लोकसंख्या 16 टक्के असून, या समाजाचा भाजपला पाठिंबा आहे. याचवेळी येडियुरप्पांनाही या समाजातून अधिक मान्यता आहे. येडियुरप्पांनी  मठाधिपतींना आपल्या पाठीशी उभे करुन केंद्रातील भाजप सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आव्हान देण्याची भूमिका घेतली होती. आता 24 तासांतच येडियुरप्पांनी यू टर्न घेत पक्षशिस्तीचे गोडवे गायले आहेत. 

येडियुरप्पा यांना नुकतेच पक्ष नेतृत्वाने दिल्लीला पाचारण केले होते. त्यांनी पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही येडियुरप्पा यांनी भेट घेतली. या भेटीत येडियुरप्पांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. यासाठी येडियुरप्पांनी प्रकृतीचे कारण पुढे केले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com