राजीनाम्याची चर्चा सुरू असताना येडियुरप्पा म्हणाले, मोदी, शहा अन् नड्डांचे माझ्यावर विशेष प्रेम! - karnataka chief minister b s yediyurappa says will abide by party decision-sj84 | Politics Marathi News - Sarkarnama

राजीनाम्याची चर्चा सुरू असताना येडियुरप्पा म्हणाले, मोदी, शहा अन् नड्डांचे माझ्यावर विशेष प्रेम!

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 जुलै 2021

मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांना पदावरुन हटवण्यासाठी पक्ष नेतृत्वाने हालचाली सुरू केल्या आहेत. या प्रकरणी येडियुरप्पांनी अखेर मौन सोडले आहे. 

बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) भाजपमधील (BJP) अंतर्गत मतभेद दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांना पदावरुन हटवण्यासाठी पक्ष नेतृत्वाने हालचाली सुरू केल्या आहेत. या प्रकरणी येडियुरप्पांनी अखेर मौन सोडले आहे. पक्षाच्या आमदारांची बैठक 25 जुलैला होणार असून, यात त्यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. 

येडियुरप्पांच्या राजीनाम्याबाबत तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. यामुळे त्यांनी अखेर मौन सोडले आहे. ते म्हणाले की, मला पक्षाचे केंद्रीय नेतृत्व 25 जुलैला जो आदेश देईल, त्याचे पालन मी करेन. मी माझे काम 26 जुलैपासून सुरू करेन. राज्यातील भाजप सरकारला 2 वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त 26 जुलैला कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर पक्षश्रेष्ठी देतील त्या आदेशाचे मी पालन करेन. 

आगामी काळात मला पक्ष भक्कम करायचा आहे. याचबरोबर राज्यात पुन्हा भाजपलाच सत्तेत आणायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचे माझ्यावर विशेष प्रेम आणि विश्वास आहे. पक्षातील 75 वर्षांच्या पुढील नेत्याला कोणतेही पद दिले जात नाही. परंतु, मी 78 वर्षे पूर्ण केलेली असतानाही त्यांनी मला संधी देऊन माझ्या कामाच कौतुक केले, असे येडियुरप्पा यांनी सांगितले. 

हेही वाचा : येडियुरप्पांचा 24 तासांतच यू-टर्न 

दरम्यान, येडियुरप्पांनी ट्विटरवर म्हटले आहे की, मी भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता बनण्याची संधी मला मिळाली हे माझे भाग्य आहे. पक्षाची सेवा करणे हा माझा सन्मान असून, उच्च मूल्ये आणि चांगले वर्तन मी कायम ठेवले. प्रत्येकाने पक्षाच्या नीतीमूल्यांप्रमाणे वागावे. कुणीही निषेध अथवा बेशिस्तीचे वर्तन करु नये. बेशिस्तिीने तुम्ही पक्षाचा अनादर करत आहात. 

हेही वाचा : शिवकुमार - सिद्धरामय्या वादात राहुल गांधींची मध्यस्थी 

येडियुरप्पा हे 78 वर्षांचे आहेत. त्यांना मुख्यमंत्री पदावरुन हटवण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाकडून पावले उचलण्यास सुरवात झाली आहे. येडियुरप्पा यांना यासाठी मागील आठवड्यात दिल्लीलाही बोलावून घेण्यात आले होते. त्यांनी पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही येडियुरप्पा यांनी भेट घेतली. या भेटीत येडियुरप्पांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. यासाठी येडियुरप्पांनी प्रकृतीचे कारण पुढे केले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख