मी राजीनामा देतोय, असं म्हणत निरोप घेताना येडियुरप्पांना अश्रू अनावर

कर्नाटकात मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी राजीनामा दिला आहे. येडियुरप्पांनी चार वेळा कर्नाटकचे मुख्यमंत्रिपद भूषवले आहे.
karnataka chief minister b s yediyurappa says he will resign after lunch
karnataka chief minister b s yediyurappa says he will resign after lunch

बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांनी राजीनामा दिला आहे. राज्यातील भाजप (BJP) सरकारच्या द्विवर्षपूर्ती दिवशीच त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली. येडियुप्पांनी स्वत: राजीनाम्याची घोषणा केली असून, या वेळी त्यांना अश्रू आवरता आले नाहीत. 

येडियुरप्पांची मुख्यमंत्री ही चौथी टर्म आहे. त्यांच्या चौथ्या टर्ममधील मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात येडियुरप्पांनी राजीनाम्याची घोषणा केली. ते म्हणाले की, मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. मी जेवणानंतर राज्यपालांना भेटून राजीनामा सुपूर्द करेन. 

येडियुरप्पा हे 78 वर्षांचे आहेत. त्यांना मुख्यमंत्री पदावरुन हटवण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाकडून पावले उचलण्यास सुरवात झाली आहे. येडियुरप्पा यांना यासाठी मागील आठवड्यात दिल्लीलाही बोलावून घेण्यात आले होते. त्यांनी पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही येडियुरप्पा यांनी भेट घेतली. या भेटीत येडियुरप्पांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. यासाठी येडियुरप्पांनी प्रकृतीचे कारण पुढे केले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

राज्यात लिंगायत समाजाची लोकसंख्या 16 टक्के असून, या समाजाचा भाजपला पाठिंबा आहे. याचवेळी येडियुरप्पांनाही या समाजातून अधिक मान्यता आहे. येडियुरप्पांना हटवून इतर समाजातील नेता मुख्यमंत्री बनवल्यास भाजपचा हा हक्काचा मतदार दुरावला जाण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून लिंगायत नेताच पुन्हा मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केला जाऊ शकतो, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. 

येडियुरप्पांच्या राजीनाम्याची चर्चेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. येडियुरप्पांच्या विरोधात त्यांच्या सहकाऱ्यांनी उघड बंड पुकारले आहे. येडियुरप्पांचे पुत्र विजयेंद्र हे 'सुपरसीएम' असल्याची टीका मंत्रिमंडळातील सहकारी करीत आहेत. नुकतीच विजयेंद्र यांनी नड्डा यांची दिल्लीत भेट घेतली होती. यामुळे येडियुरप्पांचे उत्तराधिकारी विजयेंद्र ठरतील, या  मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेने जोर पकडला आहे. 

येडियुरप्पांना हे राज्यातील लिंगायत समाजाचे मोठे नेते आहेत. येडियुरप्पांना राजीनामा देण्यास भाग पाडू नये यासाठी राज्यातील लिंगायत मठांच्या प्रमुखांनी केंद्रातील भाजप नेतृत्वाला उघड इशारा दिला होता. याचबरोबर लिंगायत समाजाच्या काँग्रेस आमदारांनाही भाजपला इशारा दिला होता. यामुळे येडियुरप्पांच्या जागी लिंगायत नेताच मुख्यमंत्री बनावा, असा आग्रह पक्ष नेतृत्वाकडे धरला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही हीच भूमिका घेतली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com