पंतप्रधान मोदींचा सल्ला मुख्यमंत्री येडियुरप्पांनी अखेर मानला नाहीच! - karnataka chief minister b s yediyurappa imposes 14 days lockdown in state | Politics Marathi News - Sarkarnama

पंतप्रधान मोदींचा सल्ला मुख्यमंत्री येडियुरप्पांनी अखेर मानला नाहीच!

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 एप्रिल 2021

देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला आहे. कर्नाटकात रुग्णसंख्या वेगाने वाढू लागल्याने अखेर लॉकडाउन लावण्यात आला आहे. 

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला आहे. याचबरोबर कर्नाटकातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने राज्यात आजपासून 14 दिवसांचा लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउन हा शेवटचा पर्याय असावा, अशा सूचना सर्व राज्यांना केल्या होत्या. तरीही मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी लॉकडाउनचा निर्णय घेतला आहे. 

कर्नाटकात मागील 24 तासांत 29 हजार 744 नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. देशातील दहा राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहे. मागील 24 तासांत आढळलेल्या कोरोना रुग्णांपैकी 69.1 टक्के रुग्ण या दहा राज्यांतील आहेत. यात महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, गुजरात आणि राजस्थान यांचा समावेश आहे. 

कर्नाटकातील वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी अखेर मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी आजपासून 14 दिवसांचा लॉकडाउन लावला आहे. या काळात राज्यात संचारबंदी असणार आहे. केवळ अत्यावश्यक सेवांना सकाळी 6 ते 10 या वेळेत परवानगी असेल. सकाळी 10 नंतर सगळी दुकाने बंद असणार आहेत. केवळ बांधकाम, उत्पादन आणि कृषी क्षेत्राला यातून सवलत देण्यात आली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही बंद आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झालेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी लॉकडाउनला विरोध करीत तो शेवटचा पर्याय असायला हवा, अशा सूचना केल्या होत्या. आता भाजपशासित कर्नाटकात कडक लॉकडाउन लावला आहे. मुख्यमंत्री येडियुरप्पांनी एकप्रकारे पंतप्रधान मोदींचा सल्ला डावलला आहे. मोदींच्या सल्ल्याच्या उलट निर्णय येडियुरप्पांनी घेतला आहे. 

देशात 24 तासांत 3 लाख 23 हजार रूग्ण 
देशात आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत कोरोनाचे नवीन 3 लाख 23 हजार 144 रुग्ण सापडले असून, 2 हजार 771 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 1 कोटी 76 लाख 36 हजार 307 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 1 लाख 97 हजार 894 झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे

देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 28 लाखांवर गेली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या वाढल्याने देशातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला आहे. यामुळे रुग्णांसाठी रुग्णालये अपुरी पडू लागल्याचे चित्र आहे. देशातील कोरोनाची रुग्णसंख्या दररोज वेगाने वाढत आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 28 लाख 82 हजार 204 असून, एकूण बाधितांमध्ये याचे प्रमाण 16.34 टक्के आहे. देशात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी होऊन ते 82.54 टक्क्यांवर आले आहे. देशात बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 45 लाख 56 हजार 209 आहे. याचवेळी मृत्यूदर 1.12 टक्के आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख