थेट नरेंद्र मोदींसमोरच मुख्यमंत्री येडियुरप्पा म्हणाले, मी राजीनामा देतो! - karnataka chief minister b s yediyurappa asked to resign by bjp | Politics Marathi News - Sarkarnama

थेट नरेंद्र मोदींसमोरच मुख्यमंत्री येडियुरप्पा म्हणाले, मी राजीनामा देतो!

वृत्तसंस्था
शनिवार, 17 जुलै 2021

कर्नाटकात भाजपमधील अंतर्गत मतभेद दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांना पदावरुन हटवले जावे,  अशी पक्षातूनच मागणी होत आहे. 

बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) भाजपमधील (BJP) अंतर्गत मतभेद दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांना पदावरुन हटवले जावे,  अशी पक्षातूनच मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर येडियुरप्पांना दिल्लीला बोलावून घेण्यात आले आहे. त्यामुळे उत्तराखंडप्रमाणे कर्नाटकातही मुख्यमंत्री बदल होणार अशी चर्चा सुरू होती. प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा देण्याची तयारी खुद्द येडियुरप्पांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समोर दर्शवली, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

येडियुरप्पा यांना पक्ष नेतृत्वाने दिल्लीला पाचारण केले आहे. ते 16 जुलैला दिल्लीत दाखल झाले असून, त्यांनी पहिल्यांदा पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेतली. त्यानंतर ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल सायंकाळी 7 वाजता येडियुरप्पा यांनी भेट घेतली. या भेटीत येडियुरप्पांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. यासाठी येडियुरप्पांच्या प्रकृतीचे कारण पुढे केले आहे. 

उत्तराखंडचे तत्कालीन मुख्यमंत्री तिरथसिंह रावत यांना असेच अचानक दिल्लीत बोलावण्यात आले होते. नंतर त्यांनी राज्यात परत जाऊन थेट राज्यपालांकडे राजीनामा सोपवला होता. त्यानंतर पुष्करसिंह धामी उत्तराखंडचे नवीन मुख्यमंत्री बनले होते. त्यामुळे कर्नाटकमध्ये उत्तराखंडची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. कर्नाटकमध्ये लवकरच नवा मुख्यमंत्री निवडण्याची प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

हेही वाचा : पंजाब काँग्रेसमध्ये बंड...पक्षाचे प्रभारी चॉपरमधून थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला 

येडियुरप्पा आणि मंत्रिमंडळातील काही सहकाऱ्यांचे संबंध काही दिवसांपासून बिघडले आहेत. राज्य सरकारमध्ये येडियुरप्पा कुटुंबीयांचा सातत्याने हस्तक्षेप सुरू आहे. सरकारच्या प्रत्येक विभागात येडियुरप्पांचा मुलगा ढवळाढवळ करीत आहे, असा आरोप करण्यात येत आहे. कर्नाटकात मागील काही काळापासून भाजपच्या नेत्यांनी उघडपणे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. याचबरोबर काही आमदारांनी तर थेटपणे मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले आहे. राज्यातील भाजप नेत्यांमध्ये मुख्यमंत्र्यांबद्दल मोठी नाराजी आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पदावरुन हटवले जाईल, अशी चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रभारी अरुणसिंह यांनी नुकतीच राज्यातील नेत्यांशी चर्चा केली होती. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख