कंगनाने आपलं टि्वटर राजकीय पक्षाला चालवायला देऊ नये..राऊतांचा टोला - Kangana should not allow her Twitter to be run by a political party : Raut | Politics Marathi News - Sarkarnama

कंगनाने आपलं टि्वटर राजकीय पक्षाला चालवायला देऊ नये..राऊतांचा टोला

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 5 सप्टेंबर 2020

मुंबईसाठी सर्वपक्षांनी एकत्र यायला हवं होतं. कंगना राणावतबाबत भारतीय जनता पक्षाने आक्रमक भूमिका घ्यायला हवी होती.

मुंबई : कंगना राणावतने स्वतःचं टि्वटर हॅडल स्वतःचं वापरावं, राजकीय पक्षाला स्वतःचं टि्वटर हॅडल चालवायला देऊ नये, असे सांगत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी आज हे व्यक्तव्य केलं आहे. 

संजय राऊत म्हणाले, "मुंबईसाठी सर्वपक्षांनी एकत्र यायला हवं होतं. कंगना राणावतच्या मुंबईबाबतच्या टि्वटवरून भारतीय जनता पक्षाने आक्रमक भूमिका घ्यायला हवी होती. मुंबईही मराठी माणसांच्या बापाचीचं आहे." अमृता फडणवीस यांनी केलेल्या टि्वटबाबत संजय राऊत यांनी बोलण्यास नकार दिला. 

मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे...ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा..शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्या शिवाय राहाणार नाही, असे टि्वट संजय राऊत यांनी केलं आहे. पाकव्याप्त काश्मीरशी मुंबईची तुलना करणारी अभिनेत्री कंगना रनौत हिच्या निषेधार्थ काल मुंबईत अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी निदर्शने केली. मागाठाणे येथे महिला शिवसैनिकांनी तिच्या फोटोला काळे फासले.

मागाठाणे येथे टाटा पॉवर हाऊस जवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन झाले. माजी नगरसेविका व सोलापूर जिल्हा संघटक संजना घाडी तसेच नगरसेविका व विधी समिती अध्यक्षा शीतल म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली महिला शिवसैनिकांनी येथे तीव्र आंदोलन केले.

या वेळी शिवसैनिकांनी कंगनाच्या निषेधार्थ घोषणा दिल्या व फलकही फडकवले. मुंबईत येऊन बॉलीवूडमध्ये नावलौकिक मिळविणाऱ्या कंगनाने मुंबईशी कृतघ्नपणा दाखवला आहे. मुंबईत येण्यापूर्वी कंगना ला कोणीही ओळखत नव्हते. ज्या शहराने तिला प्रसिद्धी, नाव, मानमरातब, पैसा मिळवून दिला, त्याच शहराबद्दल तिने वाईट उद्गार काढले.

खरा मुंबईकर याबद्दल तिला कधीही माफ करणार नाही, असे संजना घाडी यांनी या वेळी बोलून दाखवले. शिवसैनिकांनी कंगनाच्या फोटोला काळेही फासले, नंतर त्या फोटोला जोड्यांना मारून तो फोटो जाळण्यातही आला. या वेळी नगरसेविका रिद्धी खुरसंगे, गीता सिंघण,  संध्या दोशी, विभागप्रमुख आमदार विलास पोतनीस हजर होते. घाटकोपर, कुर्ला येथेही शिवसैनिकांनी तीव्र निदर्शने केली. 

कंगना राणावतला आमदार प्रताप सरनाईक यांनी चांगलचं फटकारलं आहे. याबाबत आमदार सरनाईक यांनी टि्वट केलं आहे. यात ते म्हणतात की कंगनाला खासदार संजय राऊत यांनी सैाम्य शब्दात समज दिली आहे. कंगना जर मुंबईत आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत. उद्योजक व सेलेब्रिटी घडवणाऱ्या मुंबईची तुलना  पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनावर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांना मागणी करणार आहे.

प्रताप सरनाईक म्हणतात, "मी माझ्या विधानावर ठाम आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत १०६ वीरांनी पत्करलेल्या हौतात्म्यामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. त्या मराठी माणसाच्या रक्त सांडून मिळवलेल्या मुंबई बद्दल कोणीही काहीही बोलेल तर खपवून घेणार नाही. भाजपने राष्ट्रीय महिला आयोगाला हाताशी धरून मला अटक करायचा खेळ रचला आहे. पण लक्षात ठेवा, मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मला कितीही वेळा तुरुंगात जावे लागले तरी मी तयार आहे." 
Edited  by : Mangesh Mahale 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख