शिवसेनेची पप्पूसेना अशी खिल्ली उडवून कंगना म्हणाली, लवकरच मी परत येतेय! - kangan ranaut slams shivsena after mumbai police register fir against her | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेनेची पप्पूसेना अशी खिल्ली उडवून कंगना म्हणाली, लवकरच मी परत येतेय!

वृत्तसंस्था
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

अभिनेत्री कंगना राणावतच्या वादग्रस्त वक्तव्यांवरुन मोठा गदारोळ उडाला होता. आता या प्रकरणी कंगना चांगलीच अडचणीत आली आहे. तरीही कंगनाकडून वादग्रस्त वक्तव्ये सुरूच आहेत. 

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत हिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. या वादग्रस्त वक्तव्यावरुन मोठा गदारोळ उडाला होता. त्यानंतरही कंगनाने वादग्रस्त वक्तव्ये करणे सुरूच ठेवले होते. वादग्रस्त वक्तव्ये केल्याप्रकरणी कंगना विरोधात कर्नाटक पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. वांद्रे पोलिसांनीही कंगना आणि तिची बहीण रंगोली चंडोली यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. यावर आता कंगनाने पुन्हा एकदा शिवसेनेला लक्ष्य केले आहे. 

कंगनाने मुंबईबद्दल वादग्रस्त वक्तव्य करुन वाद ओढवून घेतला होता. यामुळे कंगना आणि शिवसेना यांच्यात जोरदार सामना रंगला होता. यात कंगनाच्या बाजूने भाजप नेते मैदानात उतरले होते. तिने थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. तिने राज्यपालांसमोर गाऱ्हाणे मांडून, न्याय देण्याची मागणी केली होती. त्यानंतर कंगना मुंबई सोडून हिमाचल प्रदेशला तिच्या घरी परतली होती. तेथूनही तिने ट्विटरवर वादग्रस्त वक्तव्यांची मालिका कायम ठेवली होती. 

कंगनाने दोन समाजात तेढ पसरवणारे वक्तव्य केल्याप्रकरणी तिच्याविरुद्ध वांद्य्रातील महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली होती. यावर न्यायालयाने कंगना आणि तिची बहीण रंगोली चंडेल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन तापस करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत. याआधी सुशांतसिंह प्रकरणात कंगनाने मुंबई पोलिसांना लक्ष्य केले होते. आता तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन चौकशीचे आदेश न्यायालयानेच मुंबई पोलिसांना दिल्याने कंगना चांगलीच अडचणीत आली आहे. 

न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार वांद्रे पोलिसांनी कंगना आणि रंगोली यांच्याविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. यात देशद्रोहाचा गुन्हाही त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. यामुळे कंगनाच्या चांगलीच अडचणीत आल्याचे मानले जात आहे. 

कंगनावर गुन्हे दाखल होऊनही तिने पुन्हा वाद उकरून काढला आहे. तिने ट्विटरवर म्हटले आहे की, आपण सर्व नवरात्रीचा उपवास करीत आहात ना? तुम्हा सर्वांसाठी आजच्या उपवासाच्या दिवसाचे छायाचित्र पोस्ट करीत आहे. दरम्यान, माझ्याविरुद्ध आणखी एक एफआयआर दाखल झाला आहे. महाराष्ट्रातील पप्पूसेनेला माझ्याशिवाय काहीच सुचत नाही असे दिसते. त्यामुळे मी लवकरच परतेन. 

कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरात वातावरण पेटले होते. शेतकरी ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत होते. याबद्दलही कंगनाने वादग्रस्त ट्विट केले होते. तिने म्हटले होते की, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबद्दल चुकीची माहिती आणि अफवा पसरवणारे तसेच, दंगल घडवणारेच हेच लोक आता कृषी विधेयकांवर चुकीची माहिती पसरवत आहेत. देशात ते दहशतीचे वातावरण निर्माण करीत आहेत. 

या प्रकरणी वकील एल. रमेश नाईक यांनी कर्नाटकातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. कंगनाने शेतकरीविरोधी ट्विट केले असून, तिच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली होती. यावर न्यायाधीशांनी पोलिसांना या प्रकरणी कंगनावर एफआयआर दाखल करुन चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. या ट्विटमुळे भावना दुखावल्याचे नाईक यांनी म्हटले होते. 

कर्नाटक पोलिसांना न्यायालयाच्या आदेशानुसार कंगनाविरोधात एफआयआर दाखल केला आहे. तिच्यावर दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण करणे, जाणीवपूर्वक अपमान करणे, चिथावणी देणे आदी कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख