मामांनी सात महिन्यांत नारळ फोडण्याशिवाय दुसरे काय केले?

मध्य प्रदेशातील विधानसभा पोटनिवडणुकांचा जोरदार प्रचार सुरू झाला आहे. काँग्रेसने मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे.
kamal nath targets madhya pradesh chief minister shivraj singh chouhan
kamal nath targets madhya pradesh chief minister shivraj singh chouhan

भोपाळ : मध्य प्रदेशात 28 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होत असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. काँग्रेसने आज निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. या वेळी काँग्रेस नेते कमलनाथ यांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. निवडणूक आली की भाजपकडून पाकिस्तान आणि चीनचा मुद्दा उकरुन काढला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला. 

मध्य प्रदेशातील राजकीय वातावरण आता पुन्हा तापू लागले आहे. राज्यात 28 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहे. या निवडणुका 9 नोव्हेंबरला  होत आहेत. काँग्रेसचे सरकार पाडणाऱ्या भाजपला धडा शिकवण्यासाठी काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी कंबर कसली आहे. राज्यातील भाजप नेत्यांना फोडून ते मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.  

जोतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत 22 आमदार काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले होते. त्यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडले होते. आता राज्यात एकूण 28 मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहेत. यातील तब्बल 16 ग्वाल्हेर भागातील आहेत. शिंदे यांच्या ग्वाल्हेर या बालेकिल्ल्यात कमलनाथ यांनी काही दिवसांपूर्वी जोरदार शक्तिप्रदर्शनही केले होते. 

काँग्रेसने आज पोटनिवडणुकांसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. या वेळी बोलताना कमलनाथ, माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह, आमदार जितू पटवारी यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. काँग्रेसने जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना अनेक आश्वासने दिली आहेत.  

कमलनाथ यांनी मुख्यमंत्री चौहान यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, शिवराजसिंह चौहानांनी नारळ फोडणे, बनावट घोषणा आणि पायाभरणी करणे याशिवाय सात महिन्यांत दुसरे काहीही केलेले नाही. निवडणूक आली की पाकिस्तान आणि चीनचा मुद्दा उपस्थित करुन जनतेचे लक्ष विचलित केले जाते. ते आताही जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवत आहेत. शिवराज हे दिशाभूल करणाऱ्या राजकारणात माहीर आहेत.  

शिवराज म्हणतात की काँग्रेसने शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाही. परंतु, त्यांचाच मंत्री सभागृहात शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाल्याची कबुली देतो. यातून मुख्यमंत्र्यांचा खोटेपणा उघड झाला आहे, असे कमलनाथ यांनी स्पष्ट केले. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com