कळमनुरी विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजपमध्येच लढत होणार

कळमनुरी विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजपमध्येच लढत होणार

हिंगोली : जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदार संघात विजय मिळवण्यासाठी राज्यात सध्या सत्तेत असलेल्या शिवसेना-भाजपमध्येच जोरदार लढात होण्याची शक्‍यता आहे. पक्षातील अंतर्गत वादामुळे माजी आमदार गजानन घुगे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आगामी निवडणुकीत आपल्याच पक्षाचा आमदार व्हावा यासाठी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते कामाला लागल्याचे चित्र आहे. 

कॉंग्रेसचे वर्चस्व राहिलेल्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघात शिवसेना तीन वेळा विजयी झाली आहे. आतापर्यंत युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे राहिल्यामुळे भाजपला इथे संधी मिळाली नव्हती. 2014 मध्ये युती तुटल्यानंतरही भाजपने कळमनुरीत उमेदवार दिला नव्हता. मतदारसंघात भाजपचे अस्तित्व नसल्यामुळेच त्यांनी शिवसेनेचे माजी आमदार गजानन घुगे यांनाच पक्षात घेतले. त्यामुळे हा पक्ष आता चर्चेत आला आहे. 

या मतदारसंघातील निवडणूक निकालांवर नजर टाकली तर या मतदारसंघात कम्युनिस्ट पक्षाचा प्रभाव असल्याचे दिसून येते. सीपीएमने या मतदारसंघात तीनवेळा तर सीपीआयने एकदा विजय मिळवलेला आहे. कालांतराने या पक्षांचा प्रभाव ओसरला आणि कॉंग्रेसने भरारी घेतली. हिंगोलीचे विद्यमान खासदार राजीव सातव, त्यांच्या मातोश्री रजनी सातव यांनी अनुक्रमे एक आणि दोनवेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केलेले आहे. रजनी सातव या राज्याच्या आरोग्यमंत्री देखील होत्या. 

सीपीएम, सीपीआय, कॉंग्रेस आणि त्यांनतर शिवसेनेला कळमनुरीत चांगले यश मिळाले. 1990 मध्ये मारोती शिंदे तर 99 आणि 2004 मध्ये गजानन घुगे हे शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले होते. परंतु शिवसेनेला या मतदारसंघावर आपली पकड कायम राखण्यात पुढच्या दोन्ही निवडणूकीत अपयश आले. शिवसेनेतील अंतर्गत राजकारणामुळे शिवसेनेला हा मतदारसंघ गमवावा लागला होता. 

शिवसेनेतील अतंर्गत वादाचा पुरेपूर फायदा उचलत आधी राजीव सातव आणि 2014 मधील मोदी लाटेत कॉंग्रेसचे संतोष टारफे कळमनुरीतून विजयी झाले होते. सत्तेची फळे सीपीएम, सीपीआय, शिवसेना, कॉंग्रेस या पक्षांनी चाखली असली तरी मतदारसंघातील रस्ते, पाणीपुरवठा योजना आणि वीजेचे मुलभूत प्रश्‍न आजही कायम असल्याची ओरड जनतेकडून केली जाते. 

घुगेंमुळे भाजपला दहा हत्तींचे बळ 
शिवसेनेचे माजी आमदार गजानन घुगे भाजपमध्ये दाखल झाल्याने पक्षाला दहा हत्तींचे बळ मिळाले आहे. या जोरावरच 2019 मध्ये या मतदारसंघात भाजपने खाते उघडण्याच्या तयारी सुरू केली आहे. तर मतदार संघावर पुन्हा वर्चस्व मिळवण्यासाठी शिवसेना देखील जोमाने कामाला लागली आहे. उमेदवारीचा विचार केला असता शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख संतोष बांगर या एकमेव नावाचीच चर्चा मतदारसंघात सध्या सुरू आहे. घुगे यांच्या भाजप प्रवेशामुळे तेच उमेदवार असणार हे जवळपास निश्‍चत आहे. 

मोदी लाटेत विजयी झालेल्या संतोष टारफे यांनाच कॉंग्रेसकडून पुन्हा संधी देण्याची दाट शक्‍यता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने गेल्यावेळी माजी खासदार शिवाजी माने यांना मैदानात उतरवले होते. पण त्यांचा हा प्रयोग फसला. फारशी संघटनात्मक ताकद नसल्यामुळे आणि आघाडीची शक्‍यता गृहित धरून राष्ट्रवादीच्या गोटात सध्या तरी शांतता आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com