दिग्विजयसिंह अन् कमलनाथ हे तर काँग्रेसचे चुन्नू-मुन्नू... - kailsh vijayvargiya compares digvijay singh and kamal nath to chunnu munnu | Politics Marathi News - Sarkarnama

दिग्विजयसिंह अन् कमलनाथ हे तर काँग्रेसचे चुन्नू-मुन्नू...

वृत्तसंस्था
बुधवार, 14 ऑक्टोबर 2020

मध्य प्रदेशात विधानसभा पोटनिवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर सरकार आणि विरोधकांमध्ये जोरदार जुंपली आहे. 

नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे चुन्नू-मुन्नू त्यांच्या सभेला शंभर लोकही गोळा करु शकत नव्हते, अशी टीका भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी केली आहे. विजयवर्गीय यांचा रोख काँग्रेस नेते दिग्विजयसिंह आणि कमलनाथ यांच्यावर होता. मध्य प्रदेशात 28 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होत असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. 

मध्य प्रदेशातील राजकीय वातावरण आता पुन्हा तापू लागले आहे. राज्यात 28 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहे. या निवडणुका 9 नोव्हेंबर  होत आहेत. काँग्रेसचे सरकार पाडणाऱ्या भाजपला धडा शिकवण्यासाठी काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी कंबर कसली आहे. राज्यातील भाजप नेत्यांना फोडून ते मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.  

जोतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत 22 आमदार काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले होते. त्यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडले होते. आता राज्यात एकूण 28 मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहेत. यातील तब्बल 16 ग्वाल्हेर भागातील आहेत. शिंदे यांच्या ग्वाल्हेर या बालेकिल्ल्यात कमलनाथ यांनी काही दिवसांपूर्वी जोरदार शक्तिप्रदर्शनही केले होते. 

कमलनाथ यांच्यासोबत काँग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनीही सरकारविरोधात हल्लाबोल सुरू केला आहे. दोन्ही नेत्यांकडून मुख्यमंत्री चौहान यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. यामुळे भाजप नेत्यांकडून कमलनाथ आणि दिग्विजयसिंह यांना लक्ष्य केले जात आहे.  

भाजप नेते कैलास विजयवर्गीय आज एका सभेत बोलताना म्हणाले की, काँग्रेसचे चुन्नू-मुन्नू हे मागील विधानसभा निवडणुकीत त्यांच्या सभांसाठी शंभर लोकही गोळा करु शकत नव्हते. मी हे हेलिकॉप्टरमधून पाहिले आहे. त्यांच्या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे दिलेले आश्वासनही पाळले नाही. त्यामुळे प्रचारासाठी त्यांना अखेर ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे जावे लागले. शिंदे यांनी शेतकऱ्यांपर्यंत जाऊन प्रचार केला होता. सरकार स्थापन झाल्यानंतर आठ महिन्यांनी शिंदे यांनी शेतकरी कर्जमाफीचा विषय काढला. त्यावेळी कमलनाथ म्हणाले होते की सरकारकडे पैसेच नाहीत. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख