के. सिवान : शेतकऱ्याचा मुलगा ते इस्रोचा अध्यक्ष 

के. सिवान : शेतकऱ्याचा मुलगा ते इस्रोचा अध्यक्ष 

चांद्रयान २ मोहिमेतील विक्रम लँडरचा पृथ्वीवरील नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क शनिवारी (ता. ७) पहाटे तुटला, त्यामुळे भारताच्या चांद्रमोहिमेला मोठा धक्का बसला. या मोहिमेच्या यशात अनेक शास्त्रज्ञांचे योगदान आहे. त्यात भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोचे अध्यक्ष के. सिवान यांचा वाटा मोठा आहे. शेतकऱ्याचा मुलगा ते इस्रोचे अध्यक्ष असा त्यांचा प्रवास स्फूर्तिदायी आहे...

विक्रम लँडर चांद्रभूमीवर उतरण्यासाठी काही सेकंदांचा अवधी राहिला असताना त्याचा नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला. त्याच्याशी संपर्क प्रस्थापित करण्याचे प्रयत्न इस्रोच्या शास्त्रज्ञांनी केले. परंतु, त्याला यश आले नाही. चांद्रयानाची भरारी पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या वेळी इस्रोच्या मुख्यालयात उपस्थित होते. 

संपर्क प्रस्थापित होत नसल्याचे स्पष्ट होताच ही बातमी पंतप्रधानांना सांगण्याचे काम अध्यक्ष के. सिवान यांनाच करावे लागले. त्या वेळी चेहऱ्यावरील निराशा आणि दुःख त्यांना लपविता येत नव्हते. गेल्या काही वर्षांपासूनच्या सुरू असलेल्या कष्टावर तांत्रिक अडचणीमुळे पाणी पडले होते.

त्याचे दुःख अनावर होते. सिवन यांच्या नेतृत्वाखाली इस्रोने चंद्रावर भारताचा झेंडा फडकवण्यासाठी ‘चांद्रयान २’चे प्रक्षेपण केले. शेतकरी कुटुंबात जन्मलेला, पालिकेच्या शाळेत तमिळ भाषेतून शिक्षण घेतलेला मुलगा `इस्रो` या प्रतिष्ठित संस्थेचा प्रमुख बनण्यापर्यंतचा प्रवास प्रेरणादायी आहे. 

शिक्षणातील चमक 
तमिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्यातील सराक्कलविलई गावातील शेतकऱ्याचा मुलगा...नाव कैलासवदिवू सिवान. त्यांचा जन्म १४ एप्रिल १९५७ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण तमिळ माध्यमाच्या सरकारी शाळेत झाले. नागरकोईलमधील साउथ त्रावणकोर हिंदू कॉलेजमधून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. 

त्यानंतर त्यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून १९८० मध्ये एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. तर १९८२ मध्ये त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून अभियांत्रिकीमध्येच पदव्युत्तर पदवी संपादन केली. आयआयटी मुंबईमधून त्यांनी २००६ मध्ये एरोस्पेस इंजिनिअरिंग विषयात पी.एचडी. मिळविली. 

पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करणारे सिवन हे त्यांच्या कुटुंबातील पहिले व्यक्ती होते. त्यांचे बंधू आणि दोघा बहिणींना गरिबीमुळे उच्च शिक्षण घेता आले नव्हते. लहानपणी तर त्यांना पायात घालायला चप्पल किंवा बूट कधीच मिळाले नाहीत. महाविद्यालयात ते धोतर घालूनच जात असत.

 मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा पँट घातली. सिवान जेव्हा महाविद्यालयात शिकत होते, तेव्हा ते वडिलांना शेतीकामात मदत करत असत. त्यांनी पदवी परीक्षेत गणित या विषयात १०० टक्के गुण मिळविले. इतर चार विषयांतही शंभर टक्के गुण मिळाल्याने त्यांना शिष्यवृत्ती मिळाली. 

त्यातून त्यांना मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या नामांकित संस्थेत प्रवेश मिळू शकला. सिवान यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या वडिलांना शेतजमिनीचा तुकडा विकण्याची वेळ आली. मिसाईल मॅन ए.पी.जे. अब्दुल कलाम ज्या मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेचे माजी विद्यार्थी होते त्याच संस्थेत सिवान शिकले. कलाम हे चौथ्या तुकडीतील विद्यार्थी होते तर सिवान हे २९ व्या तुकडीतील विद्यार्थी होते. 

इस्रोतील वाटचाल 
सिवन हे १९८२ मध्ये `इस्रो`मध्ये दाखल झाले. त्यानंतरच्या बहुतेक सर्व अग्निबाण कार्यक्रमात त्यांचा सहभाग होता. `इस्रो`च्या प्रमुखपदाची सूत्रे २०१८ मध्ये घेण्यापूर्वी ते तिरुअनंतपुरम येथील विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे संचालक होते. भारताचा सर्वात शक्तिशाली असा जीएसएलव्ही (भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक) तयार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. 

सिवान यांनी इस्रोच्या अग्निबाणांच्या मार्गाचे सादृश्यीकरण करणाऱ्या सितारा या सॉफ्टवेअरची निर्मिती केली. फेरवापराच्या अवकाश प्रक्षेपकांची अतिशय आव्हानात्मक योजनाही त्यांच्याच प्रयत्नांमुळे पार पाडता आली. 

जानेवारी २०१८ मध्ये भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रो या संस्थेची धुरा के. सिवान यांच्या हाती देण्यात आली. इस्रोत काम करायला सुरवात केल्यानंतर ३६ वर्षांनी त्यांना प्रमुखपदाचा सन्मान मिळाला.

त्या आधी २०१७ मध्ये इस्रोने १०४ उपग्रह एकाच वेळी सोडण्याचा पराक्रम केला होता, त्यात सिवान यांचा सिंहाचा वाटा होता. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक तयार करण्यातही त्यांचीच विशेष कामगिरी कारणीभूत ठरली, स्वदेशी क्रायोजेनिक इंजिने विकसित करण्यातही त्यांचा वाटा आहे, त्यामुळेच ते ‘रॉकेट मॅन’ म्हणून ओळखले जातात. 

सत्यभामा विद्यापीठाची मानद डॉक्टरेट, विक्रम साराभाई पुरस्कार, बिरेन रॉय अवकाश विज्ञान पुरस्कार अशा अनेक मानसन्मानांनी सिवान यांचा गौरव करण्यात आला आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in