बादल यांच्यानंतर आता चौतालांवर दबाव; हरियानात राजकीय संकट?

कृषी विधेयकांवरुन देशभरात वातावरण तापले आहे. केंद्र सरकारमधून अकाली दल बाहेर पडल्यानंतर आता हरियानाही राजकीय अस्वस्थता वाढली आहे.
jjp leader dushyant chautala face pressure within party on agriculture bills
jjp leader dushyant chautala face pressure within party on agriculture bills

नवी दिल्ली : मोदी सरकारने संसदेत रेटलेल्या तीन कृषी विधेयकांवरून अकाली दलाने केंद्रातील एकमेव मंत्रिपदावर पाणी सोडले आहे. यामुळे पंजाब शेजारच्याच भाजपशासित हरियानात राजकीय अस्वस्थता वाढली आहे. भाजपबरोबर सत्तेत असलेले जननायक जनता पक्षाचे नेते व (जेजेपी) उपमुख्यमंत्री दुष्यंत चौताला यांच्यावर पक्षांतर्गत दबाव वाढला आहे.  चौताला यांनी आज सकाळी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांची भेट घेतली. त्यानंतर तेथील राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. 

शेतकरी विधेयकांवरून अकाली दलाच्या हरसिमरत कौर बादल यांनी काल केंद्रातील मंत्रिपदाचा अचानक राजीनामाच दिला. हरियाना हे पंजाबइतकेच कृषिप्रधान राज्य असून, येथील अर्थव्यवस्थाही पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांच्या हिताला बाधा आणणारी विधेयके, असे वर्णन होणाऱ्या या विधेयकांवर नरेंद्र मोदी सरकारने ताठर भूमिका घेतली आहे. यामुळे चौताला यांच्यावर पक्षातूनच प्रचंड दबाव आला आहे. 

हरियाणात शेतकरी-कामगार संघटनेने 20 सप्टेंबरला रास्ता रोकोची घोषणा केली आहे. पंजाबमध्ये रेल रोकोची हाक देण्यात आली आहे. हे विधेयक शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून घेणारे व शेतकऱ्यांच्या किमान हमीभावावरच (एमएसपी) कुऱ्हाड चालविणारे असल्याची भावना देशभरातील शेतकऱ्यांमध्ये असल्याचे भाजपमध्येही अंतर्गत पातळीवर मान्य केले जात आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपमध्ये केंद्रीय पातळीवरही हरियानातील सत्ता कायम राहण्याबाबत धाकधूक दिसत आहे. हरियानात शेतकरी असंतोषाचा भडका उडाल्यावर, एका अपरिहार्य परिस्थितीत दुष्यंत चौताला यांना दिल्लीत केंद्रीय मंत्रिपद देऊन हरियानात नव्याने निवडणुका घ्याव्यात, असा सूर भाजपच्या एका गोटातून व्यक्त होत आहे. मात्र, चौताला यांना केंद्रीय भाजप नेतृत्वाचा हा तोडगा मान्य होईल का, याबाबतही भाजपमध्ये साशंकतेचे वातावरण दिसते. 

हरसिमरत कौर बादल यांच्या राजीनाम्यानंतर दुष्यंत यांच्यावर खुर्चीला चिकटून बसणारे व खुर्चीसाठी त्यांच्यामागे भक्कमपणे उभे राहिलेल्या शेतकऱ्यांनाही वाऱ्यावर सोडणारे, अशी टीका होत आहे. त्यामुळेच आज खट्टर यांची भेट घेतल्यावर चौताला यांनी आपल्या घरातच थांबून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी दिवसभर चर्चा सुरू ठेवली. परिस्थिती हाताबाहेर गेली तर भाजपचे सर्वेसर्वा नेतृत्व (जे पी नड्डा नव्हे) हे चौताला यांच्याशी आज रात्रीपर्यंत कधीही थेट दूरध्वनीवरून संपर्क साधू शकते, असे समजते. 

चौताला यांना जेमतेम वर्षभरापूर्वी भाजपबरोबर आणणारे गृहमंत्री अमित शहा हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे सध्या सक्रिय नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच या असंतोषाबाबतची सूत्रे हाताळत आहेत. कृषी विधेयकांवर मोदी यांची भूमिका ठाम भूमिका असली तरी हरियानातील शेतकरी आंदोलनाचे व त्याच्या परिणामांचे गांभीर्य भाजप नेत्यांच्या लक्षात आले आहे. यामुळे हरियानातील भाजप आघाडी सरकारवर अस्थिरतेचे वादळ घोंघावत आहे. भाजपचे पंजाब उपप्रदेशाध्यक्ष प्रवीण बन्सल यांनी, हरसिमरत यांना इतर पक्षांच्या दबावामुळे राजीनामा द्यावा लागला, असे वक्तव्य केले होते. ते चौताला यांच्याबाबतही अतिशय सूचक मानले जाते. हरियानात काँग्रेसने राज्यपालांची भेट घेऊन विधानसभेचे विशेष अधिवेशन त्वरित बोलावण्याची मागणी केली आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com