पत्रानंतर अडचणीत आलेले प्रसाद म्हणतात, नेतृत्व बदलण्याची मागणी केलीच नव्हती! - jitin prasada said never sought leadership change in congress party | Politics Marathi News - Sarkarnama

पत्रानंतर अडचणीत आलेले प्रसाद म्हणतात, नेतृत्व बदलण्याची मागणी केलीच नव्हती!

वृत्तसंस्था
शनिवार, 29 ऑगस्ट 2020

काँग्रेसमधील नेतृत्व बदलाच्या मुद्द्यावरुन मोठा गदारोळ सुरू आहे. यात नेतृत्व बदलासाठी पक्षाला पत्र लिहिणारे 23 नेते वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. 

नवी दिल्ली : काँग्रेसच्या नेतृत्वात बदलासाठी पत्र लिहणारे 23 नेते वादाच्या केंद्रस्थानी आले  आहेत. पत्र लिहिणाऱ्या नेत्यांना पक्षातूनच लक्ष्य केले जात आहे. आता राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमधील म्हणून ओळखले जाणारे काँग्रेस नेते जितिन प्रसाद हे अडचणीत आले आहेत. त्यांनी या प्रकरणी खुलासा केला आहे. पत्राचा चुकीचा अर्थ काढण्यात आला, असा दावाही त्यांनी केला आहे.  

काँग्रेस कार्यकारी समितीची अतिशय महत्वाची बैठक नुकतीच झाली. काँग्रेसच्या 23 ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नेमावा, अशी मागणी केली होती. याचबरोबर त्यांनी पक्षातील रचनात्मक सुधारणांचा मुद्दा उपस्थित करुन पक्षाची स्थिती आणि दिशा याबाबत प्रश्न उपस्थित केले होते. याचबरोबर त्यांनी काँग्रेस कार्यकारी समितीची निवडणूक घेण्याची मागणी केली होती. अखेर पक्षाने सोनिया गांधी याच नवीन अध्यक्षाची निवड होईपर्यंत हंगामी अध्यक्षपदी कायम राहतील, असा निर्णय घेतला आहे.  

हे ही वाचा : राहुल गांधी 2024 मध्ये काँग्रेसला विजय मिळवून देऊ शकत नाहीत 

काँग्रेस नेत्यांच्या पत्राच्या मुद्द्यावरुन पक्षात दोन गट पडले आहेत. गांधी कुटुंबाचे निष्ठावंत आणि काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहिणाऱ्या नेत्यांना लक्ष्य केले आहे. सोनिया यांनीच अध्यक्षपदी राहावे अथवा राहुल यांनी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारावे, अशी मागणी करण्यात येत आहे. राहुल गांधी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर सोनिया गांधी यांनी 10 ऑगस्ट 2019 रोजी पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला होता. 

हे ही वाचा : काँग्रेस नेत्यानेच शशि थरुर यांना पाहुणा कलाकार म्हणून हिणवले

पक्षातील नेतृत्व बदलाबाबत पत्र लिहिणारे नेते हे भाजपशी संगनमत करीत आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी या बैठकीत केल्याची चर्चा सुरू झाली होती. राजस्थानमध्ये पक्षासमोर निर्माण झालेले संकट, सोनिया गांधी रुग्णालयात दाखल असतानाची नेमकी वेळ पत्रासाठी निवडण्यात आली, असे राहुल गांधी म्हणाल्याचीही चर्चा होती. अखेर पक्षाने राहुल गांधी असे काहीच बोलले नसल्याचे स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा : गुलाम नबी आझाद यांना पक्षानेच आता 'आझाद' करावे

पत्र लिहिणाऱ्या नेत्यांना काँग्रेसमधून लक्ष्य केले जात आहे. यामुळे काँग्रेस नेते जितिन प्रसाद यांनी म्हटले आहे की, आम्ही सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात संघटनात्मक बदलांचा मुद्दा उपस्थित केला होता. आमच्या पत्राचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. पक्षाच्या नेतृत्वावर आमचा पूर्ण विश्वास आहे. हे पत्र लिहिण्याचा उद्देश हा नेतृत्वात बदल करणे हा नव्हता. आम्ही पक्ष नेतृत्वाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, हा आरोप चुकीचा आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर आमचा पूर्ण विश्वास आहे.  

प्रसाद यांच्यासह त्या 23 नेत्यांवर कारवाई करण्याची मागणी लखीमपूर खेरी जिल्हा काँग्रेस कमिटीने केली आहे. यावर प्रसाद यांनी स्थानिक नेत्यांनी चिथावणी दिल्याने कमिटीने ही मागणी केल्याचे स्पष्ट केले. माझ्या मनात कोणाबद्दलही आकस नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. सोनिया गांधी यांना पत्र पाठविणाऱ्या नेत्यांमध्ये गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल, शशि थरुर आणि प्रसाद यांच्यासह 23 नेत्यांच्या सह्या होत्या. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख