नितीशकुमारांच्या कोट्यातूनच 'जुन्या मित्रा'ला जागा - jitan ram manjhi will get five seats from nitish kumar jdu in bihar election | Politics Marathi News - Sarkarnama

नितीशकुमारांच्या कोट्यातूनच 'जुन्या मित्रा'ला जागा

वृत्तसंस्था
सोमवार, 5 ऑक्टोबर 2020

बिहारमधील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. एनडीएतून लोक जनशक्ती पक्ष बाहेर पडला आहे. आता भाजप आणि जेडीयूने अखेरीस जागावाटप जाहीर केले आहे. 

नवी दिल्ली : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि  भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आता स्पष्ट झाले आहे. नितीशकुमार यांच्या जेडीयूला 122 जागा मिळाल्या असून, भाजपला 121 जागा मिळाल्या आहेत. नितीशकुमार यांना त्यांच्या कोट्यातील जागा जितनराम मांझी या 'जुन्या मित्रा'ला द्याव्या लागणार आहेत. 

कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे बिहारमधील विधानसभा निवडणूक राजकीय पक्षांच्या व्हर्च्युअल प्रचारामुळे गाजणार आहे. बिहार विधानसभेची मुदत २९ नोव्हेंबरला संपत आहे. एकूण तीन टप्प्यांत ही निवडणूक होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला होणार असून, यात ७१ मतदारसंघ आहेत. दुसरा टप्पा  ३ नोव्हेंबरला असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत.  

या निवडणुकीत आरजेडी हा काँग्रेसला सोबत घेऊन महाआघाडीचे नेतृत्व करत आहे. याचवेळी एनडीएमधील एलजेपीने वाढीव जागा मिळाव्यात म्हणून आग्रह धरला होता. लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी जास्त जागा मिळाव्यात म्हणून आग्रही भूमिका घेतली होती. त्यांच्या या भूमिकेमुळे एनडीएचे जागावाटप लांबले होते. अखेर हे जागावाटप जाहीर झाले आहे. 

एलजेपीच्या नेत्यांची बैठक काल पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखाली झाली होती. या बैठकीत पक्षाने राष्ट्रीय स्तर आणि लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत राहण्याची भूमिका घेतली होती. परंतु, बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पातळीवर जेडीयूसोबत वैचारिक मतभेद असल्याचे कारण देत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.  

चिराग पासवान यांनी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे एनडीएतील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. भाजप आणि जेडीयूने 122-121 असे जागावाटप केले आहे. दोन्ही पक्षांना त्यांच्या कोट्यातील काही जागा सहकारी पक्षांना द्याव्या लागणार आहेत. आता नितीशकुमार यांच्या जेडीयूच्या वाट्याला आलेल्या जागा सहकारी पक्षाला द्याव्या लागणार आहेत. जितनराम मांझी यांच्या हिंदुस्तानी आवाम मोर्चाला जेडीयूच्या कोट्यातील पाच जागा द्याव्या लागणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

एकेकाळी नितीशकुमार यांचे विश्वासू सहकारी असणारे मांझी त्यांचे कट्टर विरोधक बनले होते. नितीशकुमार यांनी 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारुन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी त्यांनी मांझी यांच्यावर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली होती. नंतर 2015 मध्ये नितीशकुमार यांनी परत मुख्यमंत्री होण्याची तयारी केल्यानंतर मांझी यांनी विरोध केला होता. यामुळे राज्यात राजकीय संकट निर्माण झाले होते. अखेर नितीशकुमार यांनी पुन्हा पक्ष आणि सरकार ताब्यात घेतले होते. 

या सर्व गदारोळानंतर मांझी यांची काही सहकाऱ्यांसमवेत हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी स्वत:चा पक्ष स्थापन केला होता. आता नितीशकुमार यांना स्वत:च्या कोट्यातील जागा त्याच मांझींना द्याव्या लागणार आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत मांझी हे एनडीएसोबतच होते. परंतु, त्यावेळी नितीशकुमार हे महाआघाडीसोबत होते. आता ते एनडीएसोबत आहेत. नितीशकुमार यांचा एकेकाळचा निष्ठावान सहकारी मित्र ते कट्टर शत्रू आणि आता पुन्हा सहकारी मित्र असा मांझी यांचा प्रवास राहिला आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख