शिंजो ॲबे यांच्या राजीनाम्यास कारण की.... - japans prime minister shinzo abe resigns citing health reasons | Politics Marathi News - Sarkarnama

शिंजो ॲबे यांच्या राजीनाम्यास कारण की....

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020

जपानचे पंतप्रधान शिंजो ॲबे यांनी पदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. ॲबे यांच्या अचानक राजीनाम्यामुळे जपानमधील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 

टोकियो  : जपानचे पंतप्रधानपद शिंजो ॲबे (वय ६५) हे आज पदावरून पायउतार झाले. ॲबे हे जपानचे सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहिले आहेत. त्यांनी आज अधिकृतरीत्या घोषणा करुन याबद्दलची माहिती दिली. नवीन पंतप्रधानांची निवड होईपर्यंत ॲबे हे पदावर कायम राहणार आहेत. आता ॲबे यांच्या उत्तराधिकाऱ्याचा शोध सुरू झाला आहे.  

ॲबे हे मागील काही आठवड्यांपासून सार्वजनिक जीवनापासून दूर होते. जपानमध्येही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने ॲबे यांच्या प्रकृतीबद्दल अनेक अफवा पसरत होत्या. गेल्या काही महिन्यांपासून पोटाशी निगडित आजारांनी त्रस्त आहेत. प्रकृतीच्या वाढत्या तक्रारींमुळे राजीनामा देत असल्याचे त्यांनी आज जाहीर केले. पंतप्रधानपदाची जबाबदारी पार पाडण्यास सक्षम नसल्याबद्दल त्यांनी जपानी जनतेची माफी मागितली आहे. अखेरपर्यंत माझी जबाबदारी पार पडेन, असा विश्वासही ॲबे यांनी व्यक्त केला असल्यामुळे ते नवीन पंतप्रधानपदांची निवड होईपर्यंत पदावर राहतील, हे स्पष्ट झाले आहे. 

ॲबे म्हणाले की, मी दीर्घ आजारामुळे पंतप्रधान पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. माझी मुदत अजून एक वर्ष आहे असून, मला अनेक उद्दिष्ट्ये पूर्ण करायची आहेत. परंतु, माझ्या खालावलेल्या प्रकृतीमुळे सरकारी कामकाजावर परिणाम होऊ नये, अशी माझी इच्छा आहे. यामुळेच पंतप्रधानपदाचा राजीनामा मी देण्याचा अखेर निर्णय घेतला आहे. मी ठरविलेली उद्दिष्ट्ये पूर्ण करण्याआधी राजीनामा द्यावा लागत असल्याने मला वेदना होत आहेत. काही 

ॲबे यांना तरुण वयातच पोटासंबंधी क्रॉनिक अल्सरेटिव्ह कोलायटीस हा आजार जडला आहे. याच आजारामुळे त्यांना 2007 मध्ये राजीनामा द्यावा लागला होता. उपचारामुळे त्यांचा आजार आतापर्यंत नियंत्रणात होता. गेल्या काही महिन्यांपासून त्यांना पुन्हा त्रास होऊ लागला होता. या महिन्यात ते दोनदा टोकियोतील रुग्णालयात तपासणीसाठी गेले होते. प्रकृतीत थोडी सुधारणा दिसत असली तरी आजार पूर्ण बरा होण्याची कोणतीही शक्यता नसल्याने ॲबे पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. 

ॲबे हे परंपरावादी विचारसरणीचे मानले जातात. याचबरोबर त्यांची धोरणेही राष्ट्रवादी असल्यामुळे ते अनेकवेळा उदारमतवादी विरोधकांकडून लक्ष्य झाले आहेत. अतिशय आक्रमक आर्थिक धोरणे ॲबे यांनी आखली होती. याला ॲबेनॉमिक्स असे नाव मिळाले होते. त्यांनी जपानची संरक्षण व्यवस्था भक्कम करण्यासोबत लष्करावरील खर्चातही वाढ केली होती. मात्र, त्यांचे घटनेतील पॅसिफिस्ट कलम 9 मध्ये सुधारणा करण्याचे स्पप्न पूर्ण होऊ शकले नाही. या कलमानुसार जपान स्वसंरक्षणाशिवाय इतर कोणत्याही कारणासाठी लष्कर उभे करण्यास बंदी आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख