मुख्यमंत्री असलेला भाऊ अन् कुटुंबीयांचा विरोध न जुमानता तिने निवडली राजकीय वाट! - jagan mohan reddy and family opposed political entry of y s shramila | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर म्हसवड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे

मुख्यमंत्री असलेला भाऊ अन् कुटुंबीयांचा विरोध न जुमानता तिने निवडली राजकीय वाट!

वृत्तसंस्था
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांच्या कन्या वाय. एस. शर्मिला यांनी नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. 
 

हैदराबाद : आंध्र प्रदेशचे (संयुक्त) माजी मुख्यमंत्री  वाय. एस.राजशेखर रेड्डी यांच्या कन्या वाय. एस. शर्मिला यांनी स्वतःचा नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. त्यांचे बंधू व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी आणि कुटुंबीयांचा याला विरोध असल्याची बाब समोर आली आहे. कुटुंबीयांच्या विरोधाला न जुमानता स्वतंत्र राजकारणाची वाट शर्मिला यांनी निवडली आहे. 

शर्मिला यांनी त्यांचे वडील राजशेखर रेड्डी यांच्या समर्थकांची बैठक घेतली. वायएसआर आणि विजयम्मा यांच्या लग्नाचा ५० वा वाढदिवस मंगळवारी (ता.8) असल्याने राजकीय प्रवेशासाठी हा मुहूर्त त्यांनी काढल्याची चर्चा सुरू आहे. या बैठकीत शर्मिला यांनी तेलंगणमध्ये नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली. 

शर्मिला यांनी पक्षाची घोषणा केल्यानंतर वायएसआर काँग्रेसने याबाबत विरोधाची भूमिका घेतली आहे. जगनमोहन यांचे सल्लागार व पक्षाचे नेते सज्जला रामकृष्ण रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका स्पष्ट केली. शर्मिला यांना जगन आणि कुटुंबीयांनी राजकीय पक्ष न काढण्याचा सल्ला दिला होता. मात्र, तरीही त्यांनी निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सांगितले. 

हेही वाचा : जगनमोहन यांच्या भगिनी शर्मिला यांची वेगळी 'चूल'!

सज्जला रेड्डी म्हणाले की, मी तुम्हाला खात्री देतो की जगन आणि शर्मिला यांच्यात कोणतेही व्यक्तिगत मतभेद नाहीत. मात्र, त्यांच्या राजकीय प्रवेशाबाबत मतभेद आहेत. अनेक ज्येष्ठ नेत्यांनी तेलंगणमध्ये पक्षाचा विस्तार करण्याची विनंती करुनही जगन यांनी याला नकार दिला होता. कारण त्यांना आंध्र प्रदेशच्या नागरिकांची सेवा करावयाची होती. हाच सल्ला त्यांनी शर्मिला यांनी दिली होती. मात्र, तेलंगणमध्ये राजकीय पक्ष स्थापन करण्याबाबत शर्मिला यांची वेगळी भूमिका असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जगनमोहन रेड्डी आणि शर्मिला यांच्यात मागील काही महिन्यांपासून मतभेद आहेत. जगममोहन रेड्डी यांनी बहिणीला वायएसआर काँग्रेस पक्षात कोणतेही महत्त्व न देता दूर ठेवले आहे. या पार्श्‍वभूमीवर शर्मिला या मागील काही महिन्यांपासून वायएसआर यांच्या समर्थकांशी चर्चा करीत होत्या. काँग्रेस पक्षातील  वायएसआर यांचे समर्थकही त्यांच्या संपर्कात आहेत. वायएसआर पक्षाने त्याचे क्षेत्र आंध्र प्रदेशपुरते मर्यादित केल्यानंतर तेलंगणचे अनेक नेते पक्षापासून दूर गेले. तेलंगणमधील सर्व जिल्ह्यांतील अशा नेत्यांशी शर्मिला या आता संवाद साधणार आहेत.

शर्मिला यांनी जाहीरपणे बोलताना जगनमोहन रेड्डी यांच्याशी कोणतेही मतभेद नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे की, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी हे माझे मोठे बंधू आहेत. त्यामुळे त्यांचे आशीर्वाद माझ्यामागे आहेत. आंध्रात ते स्वतःचे काम पुढे नेत आहे. म्हणूनच तेलंगणमध्येही राजन्नाचे राज्य आणण्याची गरज असल्याने मी येथे नवा पक्ष स्थापन करीत आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख